What is Michelin Star : मास्टर शेफ इंडिया (Masterchef India) हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो आहे. विविध कानाकोपऱ्यातील लोक येथे येऊन त्यांच्या उत्तम पाककला दाखवतात. दरम्यान, हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाबतील तुम्ही स्टार रेटिंगबाबत ऐकलं असेल. हॉटेलच्या उच्च गुणवत्तेवर आधारित ही रेटिंग दिली जाते. हॉटेल इंडस्ट्रीतील महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे 'मिशेलिन स्टार'. भारतातील फक्त सात शेफना हा पुरस्कार मिळवण्याचा मान मिळाला आहे.


हॉटेल जगतातील प्रसिद्ध पुरस्कार 'मिशेलिन स्टार'


'मिशेलिन स्टार' हा पुरस्कार हॉटेल जगतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. हा फ्रेंच पुरस्कार आहे. मिशेलिन पुरस्कार हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटला तेथील जेवणाच्या उच्च गुणवत्तेसाठी दिला जातो. यासोबतच त्या रेस्टॉरंटमधील शेफचादेखील गौरव करण्यात येतो. महत्त्वाचं म्हणजे मिशेलिन स्टार पुरस्कार फक्त हॉटेललाच देण्यात येतो, शेफला नाही. दरम्यान, मिशेलिन स्टार मिळालेल्या हॉटेलमधील शेफचा मिशेलिन स्टार शेफ म्हणून गौरव केला जातो.


मिशेलिन स्टार ही एक प्रकारची रेटिंग सिस्टिम आहे. ही रेटिंग रेस्टॉरंटच्या चांगल्या गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते. या रेटिंगमध्ये एकूण तीन स्टार असतात. यातील पहिला स्टार अतिशय चांगलं रेस्टॉरंट किंवा हॉटेलसाठी देण्यात येतो. दुसरा स्टार उत्कृष्ट पाककलेसाठी आणि तिसरा स्टार अद्भूत आणि विलक्षण पाककलेसाठी देण्यात येतो. मिशेलिन स्टारसाठी रेस्टॉरंटचं वातावरण आणि आर्किटेक्चर या घटकांचा परिणाम होत नाही. ही रेटिंग पूर्णपणे पाककलेवर अवलंबून असते.


सुरुवात कधी झाली?


1900 पासून मिशेलिन गाईड या जर्नलमध्ये दरवर्षी जगभरातील उत्कृष्ट, हॉटेल, रेस्टॉरंट यांची माहिती प्रकाशित केली जाते. याचा उद्देश जगभरातील पर्यटकांसाठी मार्गदर्शन करणे हा आहे. मिशेलिन गाईड सध्याचं फाइन-डायनिंग बायबल आहे. मिशेलिन स्टार रेटिंगला 1926 साली पहिल्यांदा सुरुवात झाली. त्यावेळी यामध्ये फक्त एक स्टार देण्यात यायचा. त्यानंतर 1933 साली यामध्ये दोन स्टार वाढवून तीन मिशेलिन स्टार रेटिंग करण्यात आली. 


मिशेलिन स्टार कसा मिळवायचा?


मिशेलिन स्टार रेटिंग सिस्टिम इतर ऑनलाईन रेटिंग सिस्टमप्रमाणे ग्राहकांच्या रिव्ह्यूवर अवलंबून नसतात. ही रेटिंग तज्ज्ञांच्या गुप्त तपासणीवर आधारित आहे. या तज्ज्ञांना मिशेलिन इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. दरम्यान, विशेष म्हणजे मिशेलिन इन्स्पेक्टरची ओळख गुप्त असते. मिशेलिन इन्स्पेक्टर्सला फ्रान्समध्ये अधिकृत मिशेलिन मार्गदर्शक प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर हे मिशेलिन इन्स्पेक्टर जगभरात विविध ठिकाणी जाऊन गुप्त तपासणीद्वारे फूड रिव्ह्यू करतात. इन्स्पेक्टरर्स पाच ते सहा वेळा जाऊन टेस्टिंग करतात. याबद्दल हॉटेलला कोणतीही माहिती नसते. त्यानंतर या मिशेलिन इन्स्पेक्टर्समध्ये चर्चा होते. यानुसार, रेस्टॉरंटला मिशेलिन स्टार रेटिंग द्यायचं की नाही किंवा किती स्टार द्यायचे हे ठरतं. मिशेलिन इन्स्पेक्टरला त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी सांगितलं जातं. याबद्दल त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सांगण्याची परवानगी नसते. त्यांना पत्रकारांशी बोलण्यासही परवानगी नसते. रेटिंगमध्ये भेदभाव नसावा यासाठी हे केलं जातं.


मिशेलिन स्टार काढूनही घेतला जातो


उत्कृष्ट दर्जाचे घटक वापरणाऱ्या रेस्टॉरंट्सना मिशेलिन स्टार दिले जातात. ग्राहकांना उच्च दर्जाचे, उत्तम चव असलेले पदार्थ सातत्याने तयार केल्यास हे रेटिंग दिलं जातं. दरम्यान, मिशेलिन स्टार दिल्यानंतर तुमच्याकडून चूक झाल्यास मिशेलिन स्टार काढूनही घेतला जातो. मिशेलिन इन्स्पेक्टर्स मिशेलिन स्टार दिल्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी जेवणाच्या गुणवत्तेमध्ये कमीपणा किंवा चूक दिसल्यास मिशेलिन स्टार पुरस्कार काढूनही घेतला जातो.


भारतातील सात शेफना मिळालाय मिशेलिन स्टार


'मास्टर शेफ इंडिया'चा जज विकास खन्ना याला मिशेलिन स्टार मिळाला आहे. दरम्यान, विनीत भाटिया हे भारतातील पहिले शेफ आहेत, ज्यांना मिशेलिन स्टार पुरस्कार मिळाला आहे. अल्फ्रेड प्रसाद हे सर्वात तरुण शेफ आहे, ज्याला हा पुरस्कार मिळाला. त्यासोबतच अतुल कोचर, करुणेश खन्ना, श्रीराम अयलूर, विकास खन्ना आणि मंजुनाथ मुरल या भारतीयांना मिशेलिन स्टार मिळाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


World's Expensive Sandwich : जगातील सर्वात महागडं सँडविच, अनेकांचा पूर्ण महिन्याचा पगार करावा लागेल खर्च, किती आहे किंमत?