World's Biggest Bird Statue : भारताची संस्कृतीशी नाळ फार घट्ट आहे. भारताला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यामुळे भारतातील अनेक ठिकाणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. प्राचीन मंदिर, किल्ले आणि राजवाडे यासारखी अनेक ठिकाणं आहेत, जे आपल्या इतिहासाचे पुरावे आहेत. यासाठी अनेक पर्यटनस्थळं प्रसिद्ध आहेत. भारतात असंच एक पार्क आहे. येथे जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती आहे. हे पार्क आहे केरळमध्ये. याचं रामायणासोबतही खास नातं आहे. 


जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती


केरळमधील कोल्लम येथील 'जटायू नेचर पार्क' (Jatayu Nature Park) फार प्रसिद्ध आहे. जगभरातील कानाकोपऱ्यातून लोक येथे पर्यटनासाठी येतात. विशेष म्हणजे याचा रामायणाशी खास संबंध आहे. रामायण, महाभारताचा संबंध असणारीही अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. रामायणातील जटायू पक्षी सर्वांनाच माहित आहे. रावणाने सीतामाईचं हरण केलं तेव्हा जटायूने सीतामाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रावणाने जटायूला जखमी केलं. रावणाने जिथे या जटायू पक्षाचे पंख कापले, त्याचं ठिकाणी हे जटायू पार्क उभारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पार्क 400 फूट उंचीवर उभारण्यात आलं आहे.


150 फूट रुंदी, 70 फूट उंच जटायू पक्षाची मूर्ती


केरळच्या कोल्लममधील जटायू नेचर पार्क प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे उद्यान तयार करण्यासाठी तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला. यामधील जटायू पक्षाची मूर्ती 150 फूट रुंदी, 70 फूट उंची आणि 200 फूट लांब आहे. ही जटायू पक्षाची मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असून जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती आहे. हे उद्यान एकूण 30 हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेलं आहे. हा परिसर इतका मोठा आहे की, या जागेत सुमारे 14 टेनिस कोर्ट मावतील.


येथेच जटायू पक्षाने घेतला अखेरचा श्वास


पौराणिक कथेनुसार, रावणाने पंख छाटल्यानंतर जटायू पक्षी चदयमंगलममधील डोंगराच्या माथ्यावर पडल्याचं स्थानिकांचं मत आहे. सीतामातेचे रक्षण करण्यासाठी त्याने रावणाशी पराक्रमाने युद्ध केलं, पण म्हातारपणामुळे रावणाने जटायूचा पराभव केला. यानंतर जटायूने अपहरणाची माहिती प्रभू रामाला दिली. त्यानंतर ज्या टेकडीवर जटायू पक्षाने शेवटचा श्वास घेतला. तिथे ही मूर्ती उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं.


मूर्ती बनवण्यात अनेक अडचणी


प्रसिद्ध चित्रपट निर्माते, शिल्पकार आणि गुरुचंद्रिका बिल्डर्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे​ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव आंचल यांच्या संकल्पनेतून हे पार्क उभारण्यात आलं आहे. या भव्य पार्कचा प्रकल्प आणि आकर्षक पक्षी शिल्प साकारण्याची संकल्पना त्यांचीच होती. ही मूर्ती बनवण्यासाठी सात वर्षाचा कालावधी लागला. काँक्रिटची ही मूर्ती स्टोन फिनिशिंग देऊन तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती बनवताना अनेक अडचणी आल्या कारण यासाठी लागणारं सर्व साहित्य 400 फूट उंच टेकडीवर न्यावं लागत होतं. सर्व साहित्य वरपर्यंत नेणं फार अवघड होतं. याशिवाय या मूर्तीच्या आतमध्ये थ्रीडी डिजिटल म्युझियम देखील साकारण्यात आलं असून यामध्ये रामायणाबद्दल माहिती दिली जाते.


रामायणाशी आहे खास संबंध


पौराणिक कथेनुसार, रामायणात माता सीतेचे अपहरण करुन रावण लंकेला जात असताना जटायू पक्षाशी त्याची गाठ पडली. त्यानंतर त्यांच्यात युद्ध झालं. रावणाने जटायू पक्ष्याचा वध केल्यावर तो चदयमंगलम पर्वताच्या शिखरावर पडला. सीतामातेला वाचवण्यासाठी जटायूने रावणाशी पराक्रमी झुंज दिली. पण म्हातारा असल्याने जटायूची ताकद कमी पडली, त्यामुळे तो रावणाला रोखू शकला नाही आणि रावणाने त्याचा वध केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Adiyogi Statue : 'बम बम भोले...'; 112 फूट उंच 'आदियोगी' शिवशंकराची मूर्ती, भव्यता पाहून डोळे दिपतील