Hotel In Space, Trending : सुट्टीच्या काळात आपण बाहेर फिरायला जाण्याचा किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा प्लॅन नक्कीच बनवतो. अशावेळी एखादी खास जागा निवडली जाते. पण, सतत एकाच ठिकाणी जाऊन कंटाळा देखील येऊ लागतो. अशावेळी जर तुम्हाला अंतराळात फिरण्याची संधी मिळाली तर? होय. आठवीत शिकणाऱ्या एका मुलीने यासाठी ‘हॉटेल इन स्पेस’ अशी संकल्पना मांडली आहे. यात तिने अंतराळात हॉटेल (Hotel In Space) कसे बांधता येईल, याचे संपूर्ण नियोजन केले आहे.


कोलकातामधील एका शाळेत आठवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने अंतराळातील एका हॉटेलचा अहवालच तयार केला आहे. इतकंच नाही, तर त्यासाठी तिला नॅशनल स्पेस सोसायटी, यूएसकडून पुरस्कारही मिळाला आहे. इलाही गुप्ता (Elahe Gupta) या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने अहवाल बनवला आणि तो अमेरिकेतील नॅशनल स्पेस सोसायटीला पाठवला. तिने तयार केलेल्या या अहवालाने साऱ्यांचेच लक्ष वेधले. तिची ही कल्पना स्पर्धेच्या परीक्षकांनाही आवडली.


स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट


2018 पर्यंत 'स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट' ही स्पर्धा नासाकडून आयोजित केली जात होती. मात्र, आता नॅशनल स्पेस सोसायटी ही स्पर्धा गेली अनेक वर्षे आयोजित करत आहे. यावर्षी 22 देशांतील 17,000हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. वयोगटानुसार ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत इलाहीने पारितोषिक पटकावले. ती न्यूटाऊन येथील चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे.


काय आहे ही संकल्पना?


इलाहीच्या अहवालात म्हटल्यानुसार, हे हॉटेल कोणत्याही ग्रहावर असणार नाही. ते पृथ्वीच्या निम्न कक्षेत (LEO) अवकाशात कक्षेत तरंगत राहील. त्यामुळे जर कुणाला या हॉटेलला भेट द्यायची असेल, तर फार लांबचा प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे अंतराळ प्रवासासाठी इच्छुक पर्यटकांना अडचण येणार नाही.


अवकाशातील हे हॉटेल बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरायचे, यावरही इलाहीने संशोधन केले आहे. तिच्या अहवालानुसार या हॉटेलच्या बांधकामासाठी कार्बन नॅनोट्यूब, केल्वर फायबर आणि लीड ग्लास वापरली जाऊ शकते, जी निसर्गाच्या सर्व शक्तींचा प्रतिकार करण्यास सक्षम असेल.


इलाहीच्या संकल्पनेतील या हॉटेलमध्ये तुम्ही हवे असल्यास, तुमच्या पाळीव प्राण्यांनाही घेऊन जाऊ शकता. इलाहीने तिच्या स्वप्नातील या हॉटेलचे नाव 'लायका स्टार' असे ठेवले आहे. ‘लायका’ नावाचा एक कुत्रा ‘स्पुतनिक 2’सोबत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा पहिला प्राणी ठरला होता, त्याच्याच नावावरून इलाहीला हे नाव सुचले आहे.


इलाहीला तिच्या शाळेतील एका शिक्षकाने ही कल्पना सुचवण्यास मदत केली होती. इलाहीने या अहवालाचे काम त्यांच्या देखरेखीखाली केले आहे. तर, मागच्या वर्षीच्या वाढदिवसाची भेट म्हणून तिच्या पालकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 हजार रुपयांची प्रवेश फी भरली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :