Daylight Saving Time : 'या' देशांत घड्याळाची वेळ वर्षातून दोनदा बदलली जाते; जाणून घ्या यामागचं कारण
Daylight Saving Time : दिवसाच्या उजेडाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी जगभरातल्या जवळपास 70 देशांत ही पद्धत वापरली जाते.
Daylight Saving Time : दिवसभरात आपण जे काही काम करतो ते घड्याळात वेळ पाहूनच करतो. वेळ आपल्या वेगाने पुढे जाते. जगात असे अनेक देश आहेत, जे वर्षातून दोनदा घड्याळाची वेळ सेट करतात. या देशांमध्ये घड्याळाची वेळ साधारण एक तास पुढे किंवा मागे असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे? यामागे कोणता चमत्कार आहे का? मात्र असं काही नसून हे जाणूनबुजून केलं जातं. खरंतर असं करणं डेलाइट सेव्हिंग टाईम मानलं जातं. अमेरिकेसह जगातील इतर अनेक देशांमध्ये वर्षातून एकदा घड्याळाची वेळ एक तास पुढे केली जाते आणि नंतर ती एक तास मागे घेतली जाते. असं का केलं जातं हे जाणून घेऊया.
दिवसाच्या उजेडाचा लाभ घेणं हा होता उद्देश
पूर्वीच्या काळी असं मानलं जात होतं की, घड्याळाची वेळ पुढे केल्याने दिवसाचा प्रकाश जास्तीत जास्त वापरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त कामासाठीही वेळ मिळत असे. परंतु, कालांतराने ही धारणा बदलली आणि आता विजेचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली अवलंबली जात आहे. उन्हाळ्यात घड्याळ एक तास मागे सेट करून दिवसाचा प्रकाश जास्तीत जास्त वापरता येतो.
'या' देशांमध्ये असं घडतं
दिवसाच्या उजेडाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी जगभरातल्या जवळपास 70 देशांत ही पद्धत वापरली जाते. भारत आणि अधिकतर मुस्लिम देशांमध्ये ही पद्धत वापरली जात नाही. अमेरिकेसह जगातील 70 देशांत आठ महिन्यांसाठी घड्याळ एक तास पुढे ठेवलं जातं. आणि बाकीचे चार महिने पुन्हा एक तास मागे केलं जातं. अमेरिकेत मार्चच्या दुसऱ्या रविवारी घड्याळाची वेळ एक तास पुढे केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी पुन्हा घड्याळ एक तास मागे केलं जातं.
डेलाईट सेविंग टाईमचा फायदा
ही पद्धत वापरण्यामागचं कारण म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करणे हे होते. मात्र, वेगवेगळ्या अभ्यासातून वेगवेगळे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे या संदर्भात अनेक वाद झाले आहेत. 2008 मध्ये, अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सांगितले की, या प्रणालीमुळे सुमारे 0.5 टक्के विजेची बचत झाली. परंतु राष्ट्रीय आर्थिक संशोधन ब्यूरोने त्याच वर्षी केलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की यामुळे विजेची मागणी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :