Shrikant Shinde : 'पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा', उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde : उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ठाणे : जे काही सत्य आहे, ते आता सगळ्यांच्या समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता कठोर कारवाईची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कल्याण - डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट देखील घेतली.
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सध्या कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली. शुक्रवार रात्री घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती देखील घेतली. तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलं?
घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सत्य काय आहे, ते आता सगळ्यांच्या समोर आलंय. त्यामुळे पोलीस यासंदर्भात सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.दरम्यान ही सगळी घटना वैयक्तिक वादातून झाली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. राजकीय वाद या स्तरावर येणं योग्य नाही. या घटनेचा पक्षाशी काही एक संबंध नाही. वैयक्तिक वादातून सगळा प्रकार झल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
घटनेचं सीसीटीव्ही समोर
हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.