Pahalgam Attack: डोंबिवलीतील तीन पक्के मित्र एकत्रच शेवटच्या प्रवासाला निघाले; दहशतवाद्यांमुळे लेले, मोने अन् जोशींच्या घरावर आभाळ कोसळलं
Kashmir pahalgam Terror attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीत राहणाऱ्या तीन जणांचा समावेश आहे.

Pahalgam Attack: पहलगामच्या बैसरन व्हॅलीत मंगळवारी दहशतवाद्यांनी (Kashmir Pehalgam Aattack) बेछूट गोळीबार करुन 26 पर्यटकांना ठार मारले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. पनवेलमधील दिलीप देसले यांचा दहशतवाद्याच्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचा काल रात्री उशीरा उपचारावेळी मृत्यू झाला. याशिवाय, डोंबिलीतील (Dombivli) तीन पर्यटकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे कुटुंबासह पर्यटनासाठी गेलेले तीन रहिवासी दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. या कुटुंबातील एक बालक हाताच्या बोटाला शस्त्रातील गोळी लागल्याने जखमी झाला आहे. संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हल्ल्यात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत. संजय लेले यांच्या हर्षल नावाच्या मुलाच्या हाताला बोटी चाटून गेली आहे. त्यामुळे तोही जखमी झाला आहे. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिम भागात राहतात. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवलीत राहत असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील गटाने पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते. तेथे त्यांचा बंगला होता. एकत्र कुटुंब पध्दतीने हे कुटुंब यापूर्वी त्या भागात लेले वाड्यात राहत होते. संजय लेले हे स. वा. जोशी शाळेचे विद्यार्थी होते. मनमिळावू स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते, अशी माहिती त्यांचे सहाध्यायी देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी सांगितले. तिन्ही मृतांचे नातेवाईक रात्रीच काश्मीर येथे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी निघाले आहेत. दहशतवादी हल्ल्ल्याचा डोंबिवलीतील विविध संस्था, नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
काश्मीरला जाण्यापूर्वी शेवटचा सेल्फी
हेमंत जोशी आपल्या कुटुंबीयांसह यंदाच्या उन्हाळी सुट्टीत काश्मीरला गेले होते. या कुटुंबाने काश्मीरला जाताना विमानात बसल्यानंतर एका सेल्फी घेतला होता. हाच सेल्फी हेमंत जोशी यांचा शेवटचा फोटो ठरला. तर हर्षल मोने याच्या हाताला दुखापत झाली. दहशतवाद्यांनी गोळीबार केला तेव्हा यांत त्याचे वडील अतुल मोने यांचा मृत्यू झाला, तर हर्षलच्या हाताला गोळी चाटून गेली. 
तीन मित्र आता त्या मैदानावर पुन्हा कधीच खेळणार नाहीत
डोंबिवली शहरातील भागशाळा मैदानात संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी हे तिघेही या मैदानात जॉगिंगसाठी यायचे. तसेच यांना क्रिकेटची आवड असल्याने या मैदानातच ते क्रिकेटदेखील खेळत होते. त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी क्रिकेट खेळायचा. हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशी याने दहावीची परीक्षा झाल्यानंतर सुट्टी लागला म्हणून फिरण्यासाठी कुटुंबासह काश्मीरला गेला होता. तर दुसरीकडे संजय लेले यांचा मुलगा देखील कॉमर्सची परीक्षा पास केल्यानंतर त्यालाही सुट्टी लागली होती. तोदेखील आपल्या कुटुंबासह पहिल्यांदा करण्यासाठी काश्मीर येथे गेला होता.
त्या ठिकाणी पुरुषांना कुटुंबापासून वेगळे करण्यात आले. त्यांना तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत, असे विचारण्यात आले. दहशतवाद्यांनी त्यांना काहीतरी पुस्तक वाचण्यासाठी दिले गेले आणि त्यानंतर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. या भ्याड हल्ल्या संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला असून या तिघांचा मृतदेह आता याच भागशाळा मैदानात आणून ठेवला जाणार आहे.
आणखी वाचा























