'या' कारणांमुळे स्मार्टफोनचे होतात स्फोट; असा करा उपाय
smartphone blast : स्मार्टफोनमध्ये थर्मल लॉक फिचरचा पर्याय दिला जातो. मात्र, काही फोनमध्ये त्यानंतरही स्फोट होतो.
Smartphone Blast: मागील काही वर्षांपासून स्मार्टफोनचे स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे स्मार्टफोन युजर्समध्ये भीतीचे वातावरण आहे. स्मार्टफोनमध्ये असा स्फोट का होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही काळजी घेतल्यास स्मार्टफोनमध्ये होणारे स्फोट काही प्रमाणात टाळता येऊ शकतील. जाणून घ्या त्याबाबत...
Smartphone Blast होण्याची कारणे
ओव्हरलोड: अनेकदा स्मार्टफोनमध्ये मल्टी-टास्किंग अॅपचा वापर करणे आणि पब्जीसारखे मोबाइल गेम खेळल्यामुळे प्रोसेसरवर भार वाढतो. त्यामुळे फोनच्या बॅटरीवर भार येतो आणि बॅटरी उष्ण होते. अशा स्थितीत फोनमध्ये स्फोट होण्याची शक्यता अधिक असते. या त्रासापासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये थर्मल लॉक फिचरचा पर्याय दिला जातो. मात्र, काही फोनमध्ये त्यानंतरही स्फोट होतो.
मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट: बहुतांशी स्मार्टफोन ब्लास्ट होण्यामागे मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट अर्थात उत्पादनातील त्रुटी कारणीभूत असते. हँडसेटमध्ये लिथियम आयन बॅटरी लावण्याआधी चाचणी करणे आवश्यक असते. फोन असेम्बल करताना काही चूक झाल्यास स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. बॅटरीमधील पातळ वायरीचे तापमान प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास असा स्फोट होऊ शकतो. त्यामध्ये शॉर्ट सर्किट स्फोट होण्याची भीती असते.
थर्ड पार्टी चार्जर: बहुतांशी स्मार्टफोन स्फोट होण्यामागे थर्ड पार्टी चार्जरदेखील कारणीभूत असते. बहुतांशी लोक इतर कंपन्यांच्या चार्जरचा वापर करतात. ही चूक महागात पडू शकते. स्मार्टफोन नेहमी त्याच कंपनीच्या ओरिजनल चार्जरने चार्ज करणे आवश्यक आहे. इतर चार्जरचा वापर करणे नुकसानदायक आहे.
स्मार्टफोनचे कव्हर: स्मार्टफोनचे कव्हर व्यवस्थित नसल्यास त्यातील उष्णता बाहेर पडत नाही आणि फोन ओव्हरहिट होतो. जर तुमच्या फोनच्या कव्हरमुळे फोन गरम होत असल्यास कव्हर तातडीने बदलावे.
कसा बचाव करावा
स्मार्टफोनचा स्फोट टाळण्यासाठी त्याच्या बॅटरीवर अधिक लक्ष द्यावे लागणार. जर स्मार्टफोनची बॅटरी फुगत असेल अथवा त्यातून आवाज येत असेल तर स्फोट होण्याची शक्यता अधिक आहे.
त्याशिवाय स्मार्टफोन थेट उन्हात ठेवू नये. त्यामुळे फोन गरम होण्याची शक्यता असते आणि स्फोट होऊ शकतो. अनेकजण फोन चार्जिंगला लावून सोडून जातात. फोन दीर्घकाळ चार्जिंगला ठेवणे धोकादायक ठरू शकते.