नवी दिल्ली : देशात टेलिकॉम सेक्टरला नव्या टेक्नॉलॉजीच्या दिशेत पुढे नेण्यासाठी 5G सेवा सुरु करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. असं सांगण्यात येत आहे की, पुढील महिन्यात म्हणजेच, सप्टेंबरपासून याच्या ट्रायलला सुरुवातही करण्यात येणार आहे. यासाठी दूरसंचार विभाग 5G च्या ट्रायलसाठी कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्याबाबत विचार करत आहे. दरम्यान, स्पेक्ट्रमचा लिलाव सध्या होणार नसल्याची माहिती मिळत आहे.


6 महिन्यांच्या ट्रायलनंतरच लिलाव


बिजनेस चॅनल सीएनबीसी-टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार, दूरसंचार विभाग देशात ही सेवा सुरु करण्याआधी याची व्यवस्थित ट्रायल करणार आहे. रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, कंपन्यांना कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत 5G डिव्हाइस आणि स्पेक्ट्रमचं ट्रायल करावं लागेल.


रिपोर्टनुसार, जर हे ट्रायल यशस्वी झालं तरच पुढच्या वर्षी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यावर सरकार विचार करणार आहे. जर देशात 5G आलं तर इंटरनेट स्पीडमध्ये आणखी वाढ होईल आणि लोकांना इंटरनेटचा अनुभव आणखी उत्तमरित्या घेता येईल.


देशात आतापर्यंत 4G सर्विस सुरु आहे, ज्याची सुरुवात 2012मध्ये ब्रॉडबँड म्हणून झाली होती. 2014मध्ये एअरटेलने ही सर्विस ग्राहकांसाठी मोबाईल सेवेत आणली होती. त्यानंतर सर्व कंपन्यानी ही सेवा ग्राहकांना देण्यास सुरुवात केली.


फक्त 3 कंपन्यांना एन्ट्री, चिनी कंपन्यांना परवानगी नाही


रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, ट्रायलसाठी चिनी कंपन्यांना एन्ट्री देण्यात येणार नाही. रिपोर्टनुसार, टेलिकॉम विभागाने सुचवलेल्या उपायांनुसार, चीनमधील कंपन्या 5G सेवेच्या लिलावात किंवा ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.


टेलिकॉम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी नोकिया, सॅमसंग आणि एरिक्सन या कंपन्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्यांच्या डिव्हाइसमध्ये सर्वात आधी 5G सेवेचं ट्रायल करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :