औरंगाबाद : सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतो आहे. या मेसेजद्वारे असं सांगितलं जात आहे की, 'कृपया हे ॲप इंस्टॉल करा आणि कोविड काळात आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा'. मात्र रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्स विश्वासू साधन नाही. अशा ॲप्सचा वापर करणे घातक ठरू शकतो, असं महाराष्ट्र सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी सांगितलं आहे.


व्हॉट्सअॅप मेसेजवर असंही सांगितलं जातंय की हे ॲप तेव्हाच कार्यरत होईल जेव्हा आपला मोबाईलमधील सर्व परमिशनस द्याल. परंतु अशा परमिशन देणं यूझर्ससाठी खूप धोक्याचं आहे. हे ॲप आपल्या मोबाईल मधला डाटा सुद्धा चोरू शकतात, असं देखील यादव यांनी सांगितलं आहे. हा मेसेज एक अर्धसत्य आहे. कारण संशोधनाने असे सिद्ध झालं की कोणतेही अॅप रक्तातील ऑक्सिजनची पातळी योग्यरीत्या मोजू शकत नाही. आणि अशा ॲप्सवर विश्वास ठेवणे घातक ठरू शकते, असं त्यांनी सांगितलंय.

हे ॲप योग्यरित्या कार्यरत नाहीत. कारण यांची कार्यपद्धती ही मेडिकल पल्स oximetry यंत्राद्वारे केलेल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याच्या पद्धती सारखी नाही.

कोणतेही हेल्थकेअर ॲप हे वापरकर्त्याच्या खालील गोष्टीवर लक्ष ठेवते. जसे की- आरोग्य विषयक माहिती देणे, डॉक्टरची ऑनलाईन सल्लामसलत करणे आणि फिटनेस गोल प्राप्त करणे याकरता मदत करतात. जरी हे हेल्थकेअर ॲप वापरकर्त्याला आरोग्यविषयक माहिती सोप्या पद्धतीने देत असतील. तरीदेखील वापरकर्त्याचा खाजगी डाटा हा ॲपद्वारे घेतला जातो. हा डेटा गोळा करून साठवून शेअर करून ॲपच्या कार्यप्रणाली साठी वापरला जातो.

सायबर क्रिमिनल सध्याच्या भीतीदायक वातावरणाचा फायदा घेत मोबाईल वापरकर्त्यांची खाजगी माहिती अथवा फिंगरप्रिंट सारखी बायोमेट्रिक माहिती अशा खोट्या लिंक व ॲप्लिकेशनच्या आधारे घेऊ शकतात. अॅप हे रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्याकरिता विश्वासू साधन नाहीत आणि जरी तुम्हाला एखादा हेल्थकेअर आप वापरायचा असेल तर डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेऊन ॲपचे सेटिंग कस्टमाइज्ड करणे आवश्यक आहे.

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात

  • कोणतेही ॲप डाऊनलोड करताना सर्वात प्रथम डेवलपर रेटिंग, रिव्ह्यू, बग्ज आणि टोटल डाउनलोड हे तपासून घेणे गरजेचे आहे.

  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर आप मागितलेल्या परमिशन काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि गरज नसलेल्या परमिशन देऊ नयेत.

  • डाऊनलोड करण्याआधी पुरेपुर काळजी घेणे गरजेचे आहे.

  • सिक्युरिटी असलेलेच ॲप घेणे गरजेचं आहे.


त्यामुळे आपल्याला जर एखादं ॲप डाउनलोड करण्याची लिंक आली असेल तर हे ॲप काळजीपूर्वक डाउनलोड करा. अन्यथा आपल्या मोबाईलचा डेटा चोरीला जाऊन त्याचा वापर सायबर क्राईमसाठी होऊ शकतो. आपली अशी फसवणूक झाली आहे, असं लक्षात आल्यानंतर साईबर क्राईमकडे तक्रार करा अन्यथा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा, अशी माहिती सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी दिली आहे.