चंद्रपुरात वृद्ध पित्याचा छळ करणाऱ्या सून आणि मुलाला न्यायालयाचा दणका; दिवसभर न्यायालयात उभं करत 4 हजार रुपयांचा दंड
लग्न झालेल्या मुलाने आणि सुनेने 15 वर्ष आधीच घराचा ताबा घेतला आणि त्यांना फक्त एक खोली दिली. त्यानंतर त्यांना उपाशी ठेवणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरु झाले.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वृद्ध पित्याचा छळ केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने एका मुलाला आणि त्याच्या पत्नीला दिवसभर न्यायालयात उभं राहण्याची आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. घरात ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना आणि छळ करणाऱ्यांसाठी हा निकाल म्हणजे एक चांगला धडाच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 74 वर्षीय भगवान डोहाने धाबा या गावात एका खोलीत अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहतात. खरंतर त्यांच्यावर ही परिस्थिती त्यांच्याच मुलामुळे आली आहे. त्यामुळे त्यांना आपला मुलगा आणि सुनेविरोधात पोलिसात दाद मागण्याची वेळ आली.
लग्न झालेल्या मुलाने आणि सुनेने 15 वर्ष आधीच घराचा ताबा घेतला आणि त्यांना फक्त एक खोली दिली. त्यानंतर त्यांना उपाशी ठेवणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरु झाले. मुलगा आणि सुनेकडून होणाऱ्या या छळाविरुद्ध भगवान डोहाने यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीकडे दाद मागितली. पण त्यांच्यावरील छळ काही थांबला नाही. अखेर गावचे माजी सरपंच नामदेव सांगळे यांच्या मदतीने त्यांनी धाबा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.
साधारणतः अशा गुन्ह्यांकडे पोलीस घरघुती किंवा किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करतात. पण धाबा पोलिसांनी या प्रकरणात संवेदनशीलता दाखवत जयंत डोहाने आणि विजया डोहाने यांच्यावर 2007 च्या जेष्ठ नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. गोंडपिंपरी न्यायालयाने देखील अशा प्रकरणात घरातील वृद्धांची छळवणूक करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाने मुलगा जयंत डोहाने आणि सून विजया डोहाने यांना दिवसभर न्यायालयात उभं राहण्याची आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पोलीस आणि न्यायालयाने दाखवलेली संवेदनशीलता यामुळे भगवान डोहाने यांचा छळ करणाऱ्यांना शिक्षा झाली. ही शिक्षा जरी काही प्रमाणात प्रतिकात्मक असली तरी यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा छळ करणाऱ्यांना जरब बसेल अशीच अपेक्षा आहे.