क्रिकेटचा सामना, पण लाइट गेली, थेट महावितरणाच्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी पाइप घातला
Solapur News : रागाच्या भरात एकाने चक्क महावितरणच्या कर्मचाऱ्यांलाच बेदम मारहाण केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे.
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचे (World Cup) सामने सुरू असून, क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्यासाठी वेळ राखून ठेवतात. मात्र, सामना सुरू होण्याच्याआधीच वीज गेल्यावर एखाद्या क्रिकेटप्रेमीला राग येणे साहजिक आहे. मात्र, याच रागाच्या भरात एकाने चक्क महावितरणच्या कर्मचाऱ्यांलाच बेदम मारहाण केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे क्रिकेटची मॅच पाहता येणार नाही, म्हणून संतापलेल्या एका व्यक्तीने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी पाइप मारल्याची घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. सोलापुरातील औद्योगिक वसाहत वीज वितरण कार्यालयात बुधवारी ही घटना घडली आहे. तर, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महावितरण कर्मचारी संघटनेने सोलापूर पोलिसांकडे निवेदनद्वारे केली.
थेट कार्यालयात जाऊन केली मारहाण...
सोलापुरातील कुमठा नाका परिसरात महाराणा प्रताप झोपडपट्टी येथील विद्युत लाईनवरील झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता वायरमन ट्रान्सफॉर्मर बंद करून काम करित होते. त्या भागातील संजय कोल्हापूरे या वीज ग्राहकाने औदयोगिक वसाहत उपकेंद्र येथे फोन करून प्रधान यंत्रचालक झुल्फीकार शेख यांना जाब विचारला. त्यांनी काम चालू असल्याचे सांगितले. दीड तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल सांगताच कोल्हापुरे याने फोनवरुन अरेरावी सुरू केली. त्यानंतर तो दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वीज ग्राहक उपकेंद्राच्या आवारात पोहचला. तसेच महावितरण कर्मचारी शेख यांना धमकावीत ‘मॅच चालु झाली आहे, तुम्ही मुद्दामहुन लाईन बंद केली’ म्हणत स्ट्रीट लाईटचा लोखंडी पाइप घेऊन धावला. मात्र, यावेळी शेख यांनी स्वतःचा बचाव केल्याने तो डोक्यात न लागता मानेवर लागला. या हल्ल्यात शेख हे बेशुद्ध पडले. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
कारवाईची मागणी...
दरम्यान, महावितरणकडून विनाकारण विद्युत पुरवठा बंद केले जात नाही. दुरुस्तीच्या कामांसाठीच बंद करावे लागते. ही गोष्ट नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. काही तक्रार असल्यास अर्ज करून किंवा शांततेत बोलून मार्ग काढता येतो. मात्र काही लोक जाणीवपूर्वक महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. त्यासाठी अशा लोकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे महावितरणच्या संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातम्या: