(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! उत्तम जानकर आमचेच, ते भाजपसोबतच राहणार; भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं केला दावा
उत्तम जानकर आमचेच आहेत. ते भाजप सोबत राहतील असा विश्वास माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Chandrakant Patil on Uttam jankar : माढा लोकसभा मतदारसंघात (madha loksabha) माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर (Uttam jankar) हे कोणाला पाठिंबा देणार हा चर्चा विषय ठरत आहे. एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) तर दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळं जानकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न करत आहेत. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तम जानकर आमचेच आहेत. ते भाजप सोबत राहतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं जानकर हे भापसोबत जाणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
जानकरांना भविष्यात काय द्यायचे याबाबतची चर्चा झाली आहे
उत्तम जानकर यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यांच्यासोबत माढ्याचे भाजपचे उमेदवरा रणजितसिंह निंबाळकर आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे होते. त्यानंतर आज लगेचच जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर जानकर हे मोहिते पाटलांना पाठिंबा देणार का? अशी चर्चा सुरु होती. अशातच चंद्रकांत पाटलांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तम जानकर आमचेच ते भाजपसोबतच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जानकरांचे पक्षाबाबत काही म्हणणे होते. त्यांचं म्हणणं सविस्तरपणे देवेंद्र फडणवीस यांनी एकूण घेतलं. जानकरांना भविष्यात काय द्यायचे? याबाबतही बोलणे झाले आहे. त्यामुळं उत्तम जानकर हे भाजपसोबतच राहतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. मंगळवेढा शहरात गाठीभेटीसाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी ते बोलत होते.
मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेण्यात चूक झाली असे म्हणता येणार नाही
दरम्यान, यावेळी चंदक्रांत पाटील यांना मोहिते पाटील यांच्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, मोहिते पाटील यांना भाजपमध्ये घेण्यात चूक झाली असे म्हणता येणार नाही. त्या त्या वेळेचे निर्णय योग्य असतात. काळाच्या ओघात काही गोष्टी बदलतात, त्यामुळं त्यांना घेण्याचा निर्णय चुकला असे म्हणता येणार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते सोबत असताना त्यांचा फायदा पक्षाला झाला आणि पक्षाचा मोठा फायदा मोहिते पाटील यांना झाल्याचे पाटील म्हणाले. शेवटी जिवंत माणसाच्या जीवनात नवनवीन काही गोष्टी घडत असतात, त्यामुळं घेतलेला निर्णय चुकीचा असे म्हणता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या: