Solapur News: सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या 'चिमणी'वर हातोडा पडणार; उद्यापासून कारवाईला सुरुवात?
Solapur News: सोलापूरमधील सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवर अखेर आता हातोडा पडणार आहे... उद्यापासून 14 जून पासून कार्यवाहीला सुरुवात होणार आहे.
Solapur News: सोलापूरच्या विमानसेवेला (Solapur Airport) अडथळा ठरणारी चिमणी (chimney) पाडण्याबाबत कार्यवाही उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भात सोलापूर महापालिका प्रशासनाने सिद्धेश्वर कारखान्याच्या (Siddheshwar Sugar Factory) प्रशासकांना नोटीस बजावली आहे. 27 एप्रिल रोजी कारखान्याची चिमणी स्वतःहून पाडून घेण्यासाठी 45 दिवसांची दिलेली मुदत 11 जून रोजी समाप्त झाली आहे. पण कारखान्याने स्वतःहून चिमणी न काढल्याने महापालिका यासंदर्भात कार्यवाही उद्यापासून सुरू करत असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. स्वतः कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी ही नोटीस प्राप्त झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, या कारवाईमुळे हजारो सभासद शेतकरी बांधव देशोधडीला लागणार आहे. कारखान्याने 30 मीटरची एन.ओ.सी महापालिकेला दिलेली असताना सुध्दा ही कारवाई होत आहे. त्यामुळं हा अन्यायकारक निर्णय होत असून, एक सहकार चळवळ उद्धवस्त करण्याचे काम महापालिका प्रशासन करत असल्याची खंत कारखान्याचे तज्ज्ञ संचालक धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली.
कारखाना परिसरात 144 लागू
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास असणार बंदी असणार आहे. कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टोरंट, बार, हॉटेल धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
आज संध्याकाळी चार वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत 144 लागू राहणार आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी आदेश जारी केले आहेत. तसेच आज रात्री 12 पासून ते 18 जून पर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व वाहनासाठी रस्ता बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
काय आहे चिमणीचा वाद?
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची ही को जनरेशन प्लांटची चिमणी आहे. 2014 साली कारखान्याने ही चिमणी उभारलेली असून साधारण 90 मीटर इतकी उंची आहे. चिमणीच्या या उंचीमुळे शेजारी असलेल्या सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करता येऊ शकत नाही असा अहवाल डीजीसीएने दिला होता. सोलापूरला विमानसेवा गरजेची असल्याने ही चिमणी हटवण्याची मागणी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंच या संघटनानी केली होती. त्यातच सोलापूर महानगरपालिकेने सदरील चिमणी अनधिकृत असल्याचे ठरविले. कारवाईच्या हालचाली सुरु केल्या.
महापालिका कारवाई करू नये यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण गेली अनेक वर्ष न्यायप्रविष्ट असल्याने चिमणी पाडकामाला वेळोवेळी स्थगिती मिळत गेली. 2018 साली तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी चिमणी पाडण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांसह ताफा कारखाना परिसरात पोहोचला देखील होता. मात्र, सभासदांनी विरोध केल्याने कारवाई थांबली होती. या प्रकरणानंतर देखील सोलापूरमध्ये चिमणी हटवण्याची मागणी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंचने लावून धरली. नोव्हेंबर 2022 मध्ये सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी विमानसेवेसाठी आंदोलन सुरु केले. जवळपास एक महिना हे आंदोलन सुरू होते. तर या उपोषणाला उत्तर देण्यासाठी आणि चिमणी वरील कारवाई थांबवण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने ठिकठिकाणी आंदोलन, त्यानंतर विराट मोर्चा काढण्यात आला.
त्यानंतर सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यांनी देखील ही चिमणी अनधिकृत असल्याचे सांगितले. 27 एप्रिल 2023 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी कारखान्याला 45 दिवसात चिमणी स्वतःहून काढून घेण्यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली. 11 जून 2023 रोजी ही मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्धेश्वर कारखान्याची ही चिमणी पाडण्यासाठी महापालिकेच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मागील कारवाईच्या वेळी झालेला विरोध लक्षात घेता महापालिकेने पोलीस प्रशासनाकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यानुसार सोलापूर शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त रात्रीपासूनच कारखाना परिसरात तैनात करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कारखान्याच्या अध्यक्षांना कारवाई पूर्वी 24 तासांची नोटीस देखील बजावण्यात आली आहे.