Solapur Politics : सोलापुरात भाजपला मोठा धक्का, चार माजी नगरसेवकांचा राजीनामा
Solapur Politics : भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सोबतच माजी नगरसेवक संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी देखील आपल्यासोबत राजीनामा दिल्याची माहिती स्वतः नागेश वल्याळ यांनी दिली.
Solapur Politics : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणाऱ्या भाजपला (BJP) सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation) भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सोबतच माजी नगरसेवक संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी देखील आपल्यासोबत राजीनामा दिल्याची माहिती स्वतः नागेश वल्याळ यांनी दिली.
नागेश वल्याळ हे भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आहेत. सोलापुरात भाजप वाढवण्यासाठी स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांनी मोठी मेहनत घेतली होती. पश्चिम महाराष्ट्रतील भाजपचे पहिले आमदार म्हणून देखील त्यांना ओळखले जात होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत नागेश वल्लाळ यांनी देखील राजकारणात प्रवेश केला होता. सोलापूर महानगरपालिकेत नागेश वल्याळ यांनी नगरसेवक म्हणून काम केलं. मात्र मागील काही दिवसापासून भाजपच्या स्थानिक नेत्यावर त्यांची नाराजी होती. पक्ष संघटनेकडून डावलेले जात असल्याचा आरोप देखील नागेश वल्याळ यांनी केलाय.
नागेश वल्याळ यांचा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर निशाणा?
आपल्या माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी स्थानिक नेत्यांवर आपली नाराजी असल्याचे म्हटले आहे. मात्र अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. "शहर पक्ष श्रेष्ठींकडून भाजपच्या परंपरेला तिलांजली देऊन जुन्या तळमळीच्या कार्यकत्यांची माती करुन गटातटाचे, हुजरेगिरीचे, मालकशाहीचे राजकारण करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेचे नसून पक्षातील कार्यकत्यांना पदाचे, निवडणूक तिकीटाचे प्रलोभन दाखवून केवळ मी आणि माझ्यानंतर माझा मुलगा या अंश परंपरागतासाठी मालकशाही पद्धतीने राबवण्यात येत आहे. अशाप्रकारच्या वातावरणाला कंटाळून केवळ नाईलाजाने मी पक्षाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने अंतःकरणाने मी माझा पक्षाच्या सामान्य सभासदत्वाचा, क्रियाशील सभासदत्वाचा राजीनामा देत आहे," असे आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
नागेश वल्याळ BRS च्या वाटेवर?
आषाढी वारीच्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोलापूर दौरा केला होता. या दौऱ्यात के चंद्रशेखर राव यांनी आवर्जून नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे आमंत्रण देखील दिले होते. मात्र या संदर्भात बोलताना "बी आर एस मध्ये जाण्यासंदर्भात आपला कोणताही निर्णय झालेला नाही. माझे कार्यकर्ते, तेलुगु समाजातील बांधव या सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ," अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली.
माजी नगरसेवक सुरेश पाटील देखील राजीनाम्याच्या तयारीत?
भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील हे देखील भाजपला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. चार माजी नगरसेवकांनी राजीनामा दिल्यानंतर सुरेश पाटील हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र नगरसेवक सुरेश पाटील यांना यासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. आक्रमक स्वभावाचे नेते म्हणून ओळख असलेल्या सुरेश पाटील हे 1997 पासून महापालिकेवर सलग पाचवेळा निवडून गेले आहेत. महापालिका स्थायी समितीचे, सभापती आणि सभागृहनेतेपद देखील त्यांनी सांभाळलेले आहे. 2017 साली त्यांच्यावर विष प्रयोग देखील झाला होता. भाजपमधीलच काही लोकांनी आपल्यावर विष प्रयोग केल्याचा आरोप देखील सुरेश पाटील यांनी त्यावेळी केला होता. मात्र तरी देखील गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्येच असलेले सुरेश पाटील काही महिन्यांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.