Solapur News: सोलापुरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 18 दुचाकी जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या तब्बल 18 मोटार सायकली जप्त केल्या. ज्याची किंमत जवळपास 5 लाख 35 हजार रुपये इतकी आहे.
सोलापूर : सोलापुरात (Solapur Crime News) रविवारी एकीकडे अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीची धूम सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या तब्बल 18 मोटार सायकली जप्त केल्या. ज्याची किंमत जवळपास 5 लाख 35 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आलीय. रविवारी रात्री अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावून ही कारवाई केली.
खाजप्पा ऊर्फ ओंकार संजय जाधव (वय 25), संदीप ऊर्फ संग्या शंकर बनसोडे (रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटकेत असलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. सोलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा छडा लावण्यासाठी सोलापूर पोलिस आयुक्तानी गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी रात्री सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेण्याचे काम सुरू होते.
यादरम्यान बाईक चोर सोलापुरातील शांती चौक, पाण्याच्या टाकीजवळ असल्याची खबर खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेची एक टीम लगेचच तेथे रवाना झाली. त्याठिकाणी सापळा लावण्यात आला. यावेळी विनानंबर प्लेटची एक बाइक दिसल्याने पोलिसांनी दुचाकीस्वार असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरील दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांनी एका ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या इतर 17 दुचाकी देखील दाखवल्या. असा एकूण जवळपास 5 लाख 35 हजारांचा मुद्देमाल सोलापूर गुन्हे शाखेने जप्त केला आहे.
अटक केलेल्या आरोपी पैकी एकाचे शिक्षण आठवी तर दुसऱ्याचे बारावीपर्यंत झाले आहे. बेरोजगारीमुळे त्यांना दारूचे व्यसन लागले. यातून दोघांनी मिळून शहरात ठिकाणी बाइक चोरायच्या आणि येईल त्या किमतीत विकायच्या आणि चैन, मौजमजा करायचे. अशी माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहा. पोलिस पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासो मोरे, पोलिस अंमलदार संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, राजकुमार पवार यांनी केली.
हे ही वाचा :
Raju Shetti : पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांची ईडीकडून चौकशी करावी, राजू शेट्टींचा प्रहार