Solapur News : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक, छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Solapur News : सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाकडून सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सोलापूर : सोलापुरात (Solapur) मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक (Maratha Reservation Protest) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, चंद्रकांत पाटील यांसह विविध नेत्यांचे फोट या पुतळ्यावर लावण्यात आले होते. दसऱ्याच्या दिवशी ज्या पद्धतीने रावणाचे दहन केले जाते त्याच पद्धतीने आम्ही 11 मुखी सर्वपक्षीय नेत्यांचा पुतळा दहन केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी या आंदोलकांनी दिली.
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलचं पेटलं असल्याचं चित्र आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजही चांगलाच आक्रमक झालाय. तसेच आरक्षणासाठी तरुण सध्या आत्महत्या देखील करतायत. मागील काही दिवसांमध्ये आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. तरुणांनी आत्महत्या करु नये, गनिमी कावा पद्धतीने रस्त्यावर उतरुन लढा उभारावा असं आवाहन या मराठा आंदोलकांनी यावेळी केलं आहे.
मनमाडमध्ये कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान नाशिकमधील मनमाडमध्येही कार्यकर्ते झाल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मनमाडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आणि अन्नत्याग करत हे आंदोलन सुरु करण्यात आले. आज या ठिय्या आंदोलनाचा 37 वा दिवस आहे. तसेच अन्नत्याग आंदोलनाचा आजचा नववा दिवस असून दसऱ्याच्या दिवशी या आंदोलकांनी नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले.
मराठा तरुणांचं टोकाचं पाऊल
आरक्षणासाठी मराठा समाजाचे तरुण सध्या टोकाचं पाऊल घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला असताना आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी परभणीच्यापाथरी तालुक्यातील वडी येथे 28 वर्षे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. शैक्षणिक फी भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आमरण उपोषणाची हाक दिली आहे. त्यामुळे यावर आता सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.