शिर्डीला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू तर 6 गंभीर जखमी
Solapur News : करमाळा-नगर रोडवर भीषण अपघात , शिर्डीला जाणाऱ्या कारला कंटेनरने धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू तर 6 गंभीर जखमी झालेत.
Solapur News, सोलापूर : शिर्डीला (Shirdi) जाणाऱ्या भाविकांववर दुखाचा डोंगर कोसळलाय. करमाळा - नगर मार्गावर (karmala - nagar road) पांडे गावाजवळ आज शिर्डीला निघालेल्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. अपघात होताच, घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसही तात्काळ घटनास्थळावर पोहचले होते. सहा जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास करमाळ्यातील पांडे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर व कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार तर सहा जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटून पडली. गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडे गावाजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला . यामध्ये नवरदेव- नवरी असल्याचेही सांगितले जात आहे. अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धाव घेतल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकले . या भीषण अपघातात श्रीशैल चांदेगा कुंभार (वय 55), शशिकला श्रीशैल कुंभार (वय 50), ज्येमी दीपक हुनशामठ (38 रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय 67, रा. हुबळी) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय 26), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय 24), शशिकुमार त्रिशाला कुंभार (36), श्रीदार श्रीशाल कुंभार (वय 38), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय 8 महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय 26) अशी जखमीची नावे आहेत.