Huljanti : हुलजंतीमध्ये बिरोबा-महालिंगरायाच्या भेटीचा सोहळा, भंडारा, खारीक-खोबऱ्याची उधळण, लाखो भाविकांची उपस्थिती
Huljanti Mahalimgaraya Biroba : सोलापुरातील हुलजंतीमध्ये बाराव्या शतकापासून गुरू-शिष्याच्या भेटीची परंपरा कायम आहे. यंदा लाखो भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

सोलापूर: देशातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले गुरु बिरोबा (Biroba) आणि शिष्य महालिंगराया (Huljanti Mahalingaraya) यांच्या भेटीचा अनोखा सोहळा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती (Huljanti) येथे पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव या अनोख्या भेटीसाठी हुलजंती येथे आले होते. या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा, खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता .
दिवाळी लक्ष्मीपूजनादिवशी हा अनोखा सोहळा संपन्न झाला. यावेळी मंगळवेढ्याचे आमदार समाधान ,सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह जिल्ह्यातले अनेक नेते उपस्थित होते.
Huljanti Temple History : बाराव्या शतकापासून परंपरा
बाराव्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा असून दिवाळीच्या पाडव्याच्या पूर्व संध्येला हा अनोख्या भेटीचा सोहळा पार पडतो . या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज वर्षभर वाट पाहत असतो .
बिरोबा व महालिंगराया या गुरू-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा मंगळवारी दुपारी संपन्न झाला. अमावास्येला मुंडास बांधले गेले. मध्यान रात्री कैलासमधून शंकर पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात. यावेळी देवाची मूक भाकणूक झाली अशी भाविकांची मान्यता आहे .
त्यानंतर गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या दूध ओढ्यात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवत इतर पालख्यांनी महालिंगराया पालखीची भेट घेतली . यावेळी 'महालिंगराया- बिरोबाच्या नावान चांगभलं'च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आले.
नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला . हुलजंतीला हालमत धर्माची काशी मानली जाते. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली. परंपरेनुसार त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पाडत असतो.
ही बातमी वाचा:
























