Majha Special : ... म्हणून विठुरायाला आज आपण पाहू शकतो; विठ्ठल मूर्ती संरक्षण स्मृती उत्सव उत्साहात साजरा
Pandharpur : पहिला अफझल खान आणि नंतर औरंगजेबाने केलेल्या आक्रमणावेळी विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी ती लपवून ठेवण्यात आली होती.
पंढरपूर: विठुराया हे शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राहिलेले आहे. संतमंडळी आणि वारकरी संप्रदायाने अवघ्या विश्वाला समतेचा दिलेला संदेश आजही जगाला दिशादर्शक ठरत आहे. मात्र 325 वर्षांपूर्वी हीच विठ्ठल मूर्ती मोगल आक्रमकांच्या हल्ल्याची शिकार झाली असती. त्यावेळी या मूर्तीचे संरक्षण बडवे समाजाचे संत प्रल्हाद महाराज आणि देगावचे पाटील सूर्याजीराव घाडगे यांनी केलं. म्हणून आज आपण विठुरायाचे दर्शन घेऊ शकतो.
तो काळ मोगली आक्रमकांचा होता, अशा वेळी जीवावर उदार होऊन त्यांनी नुसतं मूर्तीचं जतन केले नाही तर तिच्यावरील नित्योपचार देखील तब्बल सहा वर्षे सुरू ठेवले. आज श्रावण वद्य पंचमी हा दिवस विठ्ठल मूर्ती संरक्षण स्मृती दिन म्हणून साजरा केला जात आहे.
शिवकाळात 1665 साली मोगल सरदार अफझल खान आणि 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 या काळात मोगल बादशहा औरंगजेबने महाराष्ट्रावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी विठ्ठल मंदिरातून मूर्ती हलवून तिचे सहा वर्षे संरक्षण करणारे सूर्याजीराव घाडगे पाटील यांच्या आठवणीनिमित्ताने आज श्रावण शुद्ध पंचमीला देगाव येथे वारकरी संप्रदाय, बडवे समाज आणि पाटील कुटुंबाकडून मूर्ती संवर्धन दिन पाळण्यात आला. अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याने देवस्थानांची मोडतोड आणि मूर्त्या भंजन करण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर येथेही त्याने हल्ले केले. यावेळी प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठल मंदिरातील मूर्ती सहकाऱ्यांच्या मदतीने देगाव येथील सूर्याजीराव पाटील यांच्या शेतात नेली . यानंतर अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला त्यावेळी पुन्हा ती विठ्ठल मूर्ती मंदिरात बसविण्यात आली.
यानंतर मोगल बादशाहने स्वराज्य संपवून टाकण्याचा विडा उचलून मंगळवेढा परिसरात तळ ठोकला आणि हिंदू मंदिरे उध्वस्त करण्यास सुरुवात केल्यावर परत विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी देगाव येथील पाटील कुटुंबाने घेतली आणि 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 या काळात म्हणजे तब्बल चार वर्षे 11 दिवस या मूर्तीला आपल्या शेतातील विहिरीमध्ये कमानीत दडवून ठेवले. या बलाढ्य विहिरीवर त्याकाळी सहा मोट चालायच्या. पण शेतीला पाणी उपसले तर विठूरायाची मूर्ती दिसेल म्हणून या पाटीलांनी आपल्या शेतीला पाणी न देता मूर्ती विहिरीत जतन केली होती. यानंतर धोका वाढल्यावर मूर्तीला गवताच्या गंजीत काही दिवस लपवून ठेवण्यात आले. पुढे मोगल सरदारांकडून तपास अधिक कडक केल्यावर सूर्याजी घाडगे यांनी आपल्या वाड्याच्या तळघरात चोर कप्पा करून येथे शेवटचे काही महिने मूर्ती लपवली.
औरंगजेबाने विठ्ठल मूर्तीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र देगाव येथील पाटलांमुळे विठ्ठल मूर्तीचे संरक्षण झाले आणि त्यामुळेच आज विठ्ठलभक्त विठुरायाच्या पायावर मस्तक ठेवून दर्शन घेवू शकत आहेत. प्रल्हाद महाराज बडवे आणि सूर्याजीराव पाटील यांनी त्याकाळी विठुरायाच्या संरक्षणासाठी जे शौर्य दाखविले त्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी देगाव येथील पाटील परिवार, वारकरी संप्रदाय आणि बडवे समाज एकत्रितपणे हा दिवस साजरा करतात .
आज सकाळी वारकरी संप्रदाय आणि बडवे समाजाच्या वतीने विठुरायाच्या पादुकांसह विठ्ठल मंदिरातून ही दिंडी देगाव येथे आली. यावेळी या दिंडीत पाटील घराण्याचे 13 वे वंशज आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बडवे समाजाचे प्रतिनिधी आणि वारकरी संत चालत देगाव येथे पोचले. येथे विठुरायाच्या पादुका विहिरीत ज्या ठिकाणी मूर्ती लपवली होती तेथे आणि तळघरातील मूर्ती ठेवलेल्या जागेत नेऊन तिचे पूजन करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायासह देगाव आणि पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ या ऐतिहासिक सोहळ्यात सामील झाले होते.