Pandharpur News : पंढरपुरातील राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका, सभासदांना 41 कोटी परत देण्याचे आदेश
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) अडचणीत सापडले आहेत. कारखान्यासाठी सभासदांकडून गोळा केलेले भाग भांडवल परत करण्याचे आदेश सेबीनं दिले आहेत.
Pandharpur News : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) अडचणीत सापडले आहेत. काळेंनी सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी (Sitaram Maharaj Sakhar Karkhana ) गोळा केलेले सभासदांचे भाग भांडवल व्याजासह परत देण्याचे आदेश सेबी ने दिले आहे. या घटनेमुळं पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. व्याजासह सभासदांची रक्कम परत करण्याबाबत अॅड. दीपक पवार (Ad. Deepak Pawar) यांनी सेबी कडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आता सेबीने काळेंना सभासदांचे भाग भांडवल परत करण्याचे आदेश दिले आहेत.
कारखान्याच्या शेअर्सपोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली
कल्याण काळे हे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली होती. त्यानंतर काळेंनी सीताराम साखर कारखाना काळेंनी विकला होता. त्यानंतर सभासदांकडून गोळा केलेली रक्कम व्याजासह परत करण्याबाबत दीपक पवार यांनी सेबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीताराम साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने व्याजासह एकूण 41 कोटी रुपयांची रक्कम जवळपास पाच हजार सभासदांना पाच जानेवारी पूर्वी परत देण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.
अॅड. दीपक पवार नेमकं काय म्हणाले?
सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी ज्या सभासदांनी भाग भांडवल दिलं होतं, त्या सर्वांची व्याजासह रक्कम परत करावी यासाठी अॅड. दीपक पवार यांनी सेबी कडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आता सेबीने कल्याणराव काळे यांना सभासदांचे भाग भांडवल परत करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत एबीपी माझानं अॅड. दीपक पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कल्याणराव काळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी 2009-10 साली सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. हा कारखाना उभा करत असताना कल्याणराव काळेंनी हजारो लोकांकडून शेअर्सपोटी कोट्यवधी रुपये घेतले होते. तशी माहिती त्यांनी सादर देखील केली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापूर्वी कल्याणराव काळे यांनी तो साखर कारखाना, ती कंपनी शिवाजीराव काळुंगे यांना विकली. गेली 10 वर्ष लोकांचे पैसे अडकून पडले आहेत. लोकांनी वारंवार मागणी करुनही शिवाजीराव काळुंगे गुंतवणुकदारांचे पैसे परत देत नव्हते. म्हणून गेल्या वर्षभरापासून सेबीकडे आम्ही तक्रारी केल्या होत्या. आमच्या तक्रारीला यश आलं आहे.
5 जानेवारी 2023 पर्यंत रक्कम देण्याचे सेबीचे आदेश
आमच्या तक्रारीनंतर सेबीनं कल्याणराव काळे आणि शिवाजीराव काळुंगे यांनी मोठा दणका दिला आहे. पाच हजार लोकांचे 17 कोटी रुपयांचे मुद्दल होते. तसेच त्यावरील व्याज असे मिळून 41 कोटी रुपये रक्कम 5 जानेवारी 2023 पर्यंत देण्याचे आदेश सेबीने दिले असल्याची माहिती दिपक पवार यांनी दिली. 5 जानेवरी 2023 पर्यंत जर सभासदांचे कल्याणराव काळे आणि शिवाजीराव काळुंगे यांनी पैसे दिले नाहीत तर, त्यांची संपत्ती जप्त करण्याचा इशारा देखील सेबीनं दिला असल्याची माहिती दिपक पवार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: