Pandharpu Water Cut : ऐन पावसाळ्यात पंढरपूर आणि सांगोल्यावर पाणी कपातीचे संकट, उद्यापासून होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा
पंढरपूर : ऐन पावसाळ्यात पावसाने (Rain) पाठ फिरवल्याने पंढरपूर, सांगोला या शहरांसह सांगोल्यातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.
पंढरपूर : ऐन पावसाळ्यात पावसाने (Rain) पाठ फिरवल्याने पंढरपूर (Pandharpur), सांगोला (Sangola) या शहरांसह सांगोल्यातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून (25 ऑगस्ट) या भागात पाणीकपातीला सुरुवात केली जाणार आहे. ऑगस्ट संपत आला तरी पाऊस न पडल्याने पंढरपूर आणि सांगोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चंद्रभागा बंधाऱ्यात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे उद्यापासून शहरात सुरुवातीला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. एवढे असूनही या चंद्रभागा बंधाऱ्यात असणाऱ्या तुटपुंज्या पाण्याचा वापर परिसरातील शेतकरी शेतीसाठी करत असून पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे.
सरकारला हस्तक्षेप करावा लागणार
आता उजनी धरणातून पाणी सोडून बंधारे भरुन घेतल्याशिवाय पंढरपूरची तहान भागणार नसल्याने शासनाला यात हस्तक्षेप करावा लागणार आहे. सध्या उजनी धरणात देखील केवळ 13 टक्के पाणीसाठा असल्याने धरणातून लगेच नदीत पाणी सोडण्यासाठी शासन पातळीवर निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या श्रावण महिना असल्याने रोज हजारोच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असून चंद्रभागेत कसेतरी पाय बुडवायचे पाणी आहे. सध्या पालिका प्रशासनाने किमान या बंधाऱ्यात उरलेल्या थोड्याफार पाण्याचा सुरु असलेला उपसा तातडीने बंद केल्यास पुढचे 10 ते 12 दिवस शहराला कसातरी पाणीपुरवठा करता येणार आहे. मात्र आता उजनीतून पाणी सोडून बंधारे भरुन घेतल्याशिवाय पंढरपूर आणि सांगोल्याची तहान भागणार नाही .
पाऊस लांबल्यास धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार
उजनी धरणावर सोलापूर , पुणे , नगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरवल्याने उजनीत अजूनही केवळ 13 टक्के जिवंत पाणीसाठा आहे. यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. आणखी दहा दिवस घाट माथ्यावर पावसाची आशा असून हा काळ गेल्यास मात्र उजनीतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार आहे. मात्र अजूनही शासनाने जिल्ह्यात टंचाई घोषित न केल्याने उजनी धरणातील सध्या असलेले पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आलेले नाही. पावसाने अजून ओढ दिल्यास मग मात्र जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनणार असून शासनाला पुढील पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीने टंचाई घोषित करुन उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याबाबत पावले उचलावी लागणार आहेत.