(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vande Bharat : वंदे भारत गाडीच्या वेळेत बदल करा, सोलापूरच्या खासदारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
Vande Bharat : 10 फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Mumbai Solapur Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशी धावणार आहे. त्यासाठी राज्यभरात चाचणी घेण्यात आली. तर येत्या 10 फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करा, अशी मागणी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आठड्यातून तीन वेळा धावणार आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या, मुंबई ते सोलापूर दरम्यान लवकरच धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेच्या मुंबई येथून सुटण्याच्या वेळेत बदल करावा असे निवेदन खासादर डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. वंदे भारत प्रकारातील ही सातवी रेल्वे गाडी असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सोलापुरातील समस्त जनतेच्या वतीने मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केल्याबद्दल खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. वंदे भारत ट्रेनमुळे या दोन शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई येथून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळेत बदल करून दुपारी चार ऐवजी संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून सोडावी, जेणेकरून सकाळी सोलापूरहून आलेल्या व्यापारी व इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल असे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. मुंबई येथून रेल्वे गाडी सुटण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. याप्रसंगी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित होते.
वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर किती ?
मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये ते एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये, मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये, मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये, मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्ट साठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल.