Solapur: आषाढी वारीत 11 लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत तपासणी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा सन्मान
Solapur : आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविकांसह अधिकारी वर्गाचा माढा येथे सन्मान करण्यात आला.
Solapur news: आषाढी यात्रा (Ashadhi wari) काळात 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 11 लाख 57 हजार वारकऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. वारकऱ्यांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविकांसह अधिकारी वर्गाचा माढा येथे सन्मान करण्यात आला. आषाढी यात्रा कालावधीत पालखी सोहळे निघाल्यापासून पंढरपूरमध्ये यात्रेचा सोहळा संपन्न होईपर्यंत आरोग्य विभागाने वारकऱ्यांच्या 32 प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या होत्या. याशिवाय पंढरपूर शहरात वाखरी, गोपाळपूर दर्शन रांग आणि 65 एकर निवास तळ या तीन ठिकाणी महा आरोग्य शिबिरे घेऊन यातही वारकऱ्यांवर मोफत तपासणी आणि उपचार केले होते.
या आरोग्याच्या महावारीत सहभागी असणारे राज्यभरातील डॉक्टर , नर्सेस अशा वर्कर आणि इतर स्वयंसेवी संस्थांचा प्रशस्तपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. माढा येथील भांगे मंगलकार्यालयात शेकडोच्या संख्येने डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. हा सन्मान सोहळा 'आनंद दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. यासाठी महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी भाविकांच्या मागणीनीसार यापुढील प्रत्येक यात्रेत शासनाने भाविकांच्या मोफत तपासणीबाबत आदेश काढून कायमस्वरुपी सोय करण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी सांगितले.
कायमस्वरुपी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्यवारी घडवण्याची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेमुळे हजारो गोरगरीब भाविकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी होऊन उपचार घेता आले होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यावर्षी कार्तिकी यात्रेमध्येही अशा पद्धतीची मोफत तपासणी होणार असली तरी यापुढील प्रत्येक यात्रेत मोफत आरोग्य तपासणीसाठी राज्य शासनाने एक आदेश काढून कायमस्वरुपी वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मोफत आरोग्य वारी घडविण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती शिवाजी सावंत यांनी दिली.
पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख 64 हजार 607, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये 5 लाख 77 अशा एकूण 11 लाख 57 हजार 684 वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी केली आहे. देहू-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 27 ते 29 जून 2023 या कालावधीत वाखरी, गोपाळपूर व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या.
महत्त्वाच्या बातम्या: