Supriya Sule: आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा, सिंधुदुर्गातील राड्यावर सुप्रिया सुळेंचा इशारा
Supriya Sule on Aditya Thackeray vs Nilesh Rane clash : राजकोट किल्ल्यावर ठाकरे-राणे गटात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा असा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग: मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी राज्यातील नेत्यांनी संंताप व्यक्त केला होता.असं असतानाच विरोधी पक्षांनीही सत्ताधारी महायुतीला धारेवर धरलं. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यामध्ये जयंत पाटील, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता. त्याचवेळी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे तिथेच उपस्थित होते. जेव्हा अदित्य ठाकरे आणि मविआचे नेते परिसरात पोहचले तेव्हा राणे समर्थकांनी अदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरेंच्या समर्थकांनीही प्रत्युत्तर देत राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राजकोट किल्ल्यावर ठाकरे-राणे गटात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा असा इशारा दिला आहे.
एबीपी माझाशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, कायदा आणि सुव्यवस्था काय करते आहे तिथे, पोलिस यत्रंणा काय करत आहे. पोलिसांची यत्रंणा आहे ना तिथे, आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं. जयंत पाटील, तेथील स्थानिक नेते ते जाणार होते, ते माहिती होतं ना, ते काल दिवसभर माध्यमांनी सांगितलं होतं, मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे, गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे. मी बारामतीत आहे, मला जास्त काही माहिती नाही. नेमकं काय सुरू आहे, ते माहिती नाही, पण माझी देेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे, शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे. काल आमचे नेते जाणार हे सर्वांना माहिती होतं, मग पोलिस आणि बाकी यत्रंणा काय करत होती असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे, तर आमच्या सर्व नेत्यांनी सुरक्षितता आणि जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं, अतिशय चुकीच आहे, असं म्हणत सुळेंनी (Supriya Sule) इशारा दिला आहे.
कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सत्ताधारी महायुतीमधील नेते सुद्धा पोहोचले आहेत. खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोटवर पोहोचले. या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुद्धा पोहोचले. त्यामुळे कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केले. दरम्यान, महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत.
त्यामुळे नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्याने राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग सुद्धा घडला. महाविकास आघाडीकडून भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. हा राडा एका बाजूने सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला.