(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विनायक राऊत आणि उदय सामंत : एकेकाळचे चांगले मित्र, बंडखोरीमुळे दोघांमध्ये टोकाचे मतभेद
कोकणातील खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत हे एकेकाळचे चांगले मित्र होते. मात्र बंडखोरीमुळे दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले आहे. उदय सामंत पैसे देऊन शिवसेना फोडत असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला आहे.
Vinayak Raut Vs Uday Samant : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील शिवसेनेच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत शिवसेनेचे सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राज्याचे नवे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत खालच्या पातळीवर येऊन घाणेरडे राजकारण रत्नागिरीमधील (Ratnagiri) पालीच्या घरातून उदय सामंत करत असल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत त्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. तसेच आमदार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला 50 लाख रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारणातील सख्खे मित्र असलेले आता वैरी झाल्याने राऊत सामंत यांच्यातील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता अधिक आहे.
उदय सामंतांनी राणे आणि समर्थकांना पोसण्याचं काम केलं : विनायक राऊत
राज्यात कुठेही घडत नाही अशा पद्धतीचे राजकारण रत्नागिरीच्या पाली इथून घडत आहे. पैसे घेऊन जा, निवडणुकांना तिकीट देतो अशाप्रकारची आमिषं दाखवून शिवसेना फोडली जात असल्याचा गंभीर आरोप उदय सामंत यांच्यावर करण्यात आला आहे. राज्यात शिवसेनेच्या 40 आमदारानी बंडखोरी केली. मात्र त्यापैकी 39 आमदारांनी कधीही केला नसेल, असा प्रकार रत्नागिरीमधील पालीमध्ये उदय सामंत यांच्या घरी सुरु आहे. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अडीच वर्षात त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचं काम केलं. एवढंच नाही तर वैभव नाईक यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधातील उमेदवाराला 50 लाख रुपये देऊन वैभव नाईकांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीत केला. वैभव नाईक हे अख्ख्या सिंधुदुर्गाचं वैभव आहे. मात्र उदय सामंत यांनी नारायण राणेंचे कट्टर कार्यकर्ते असलेले आणि उदय सामंत यांचे आडनाव बंधू असलेले मालवणमधील दत्ता सामंत यांना विधानसभेचे तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्याचे असा प्रस्ताव उदय सामंत यांनी आपल्याकडे दोन वेळा ठेवला, तो मी उधळून लावला, असा गौप्यस्फोट देखील खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीत केला.
सामंत आणि राऊत वाद उफाळण्याची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना उदय सामंत हे टक्केवारी घेत असल्याचा आरोप सुद्धा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदेत वॉटर प्युरिफायर आणि भूमी घोटाळ्यात पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अडकू नयेत म्हणून चौकशीची प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यातले 20 टक्के पालकमंत्र्यांचे होते, असा आरोप विनायक राऊतांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे. त्यामुळे आगामी काळात सामंत आणि राऊत वाद उफाळण्याची शक्यता अधिक आहे.