Sindhudurg News : खवळलेला समुद्र आणि किनारपट्टी भागात वादळी वारा यामुळे कोकणातील (Konkan) मासेमारी (Fishing) पूर्णपणे ठप्प झाली आहे. समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असल्याने गुजरातमधील 123 मासेमारी बोटी कोकणातील सुरक्षित अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयाला दाखल झाल्या आहेत. तर कोकणातील स्थानिक मच्छिमारांनी आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने लाल बावटा लावण्यात आला आहे. जेणेकरुन खवळलेल्या समुद्रात मच्छिमार मासेमारीसाठी जाऊ नये यासाठी मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने देखील मच्छिमारांनी 15 सप्टेंबरपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं आहे.
यावर्षी 1 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु झाला होता. मात्र हंगाम सुरु झाल्यापासून आतापर्यंत 20 ते 22 दिवस मासेमारी झाली. गेली दोन वर्षे वातावरणात होत असलेले बदल, येऊन गेलेले तोक्तेसारखं चक्रीवादळ, याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला होता. परिणामी कोकणातील मच्छीमार मेटाकुटीला आले होते. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला असेल अशी अपेक्षा मच्छिमारांची होती. परंतु यावर्षी समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असून मासेमारीसाठी पोषक वातावरण नसल्याने मच्छिमारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
...म्हणून जून आणि जुलैमध्ये मासेमारी बंद
पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव दरवर्षी जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते. यंदा 1 जून ते 31 जुलै हा दोन महिन्यांचा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला होता. या काळात मासेमारी पूर्णतः बंद होती. तर 1 ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली होती.
महाराष्ट्रात वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मेट्रिक टन मासेमारे
राज्यात 15 लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात. पर्सेसिन बोटी वगळता ट्रॉलिंग आणि गिलनेटसह मच्छीमार बोटिंची संख्या तीन हजाराच्या घरात आहे. केवळ आपल्याच महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मेट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.
संबंधित बातम्या