Konkan Fishing Season Starts : कोकणातील (Konkan) समुद्रात दोन महिन्यांचा मासेमारी (Fishing) बंदी कालावधी आज संपत असून, आजपासून नव्या मासेमारी हंगामाची (Fishing Season) सुरुवात होत आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्यावर स्वार होण्यास मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे. पावसाने गेले काही दिवस दडी मारली असल्याने मासेमारी हंगामाची दमदार सुरुवात होईल. 1 जून ते 31 जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या काळात मासेमारी पूर्णतः बंद असते. त्यामुळे नदी, खाडी पात्रातील मासळीचा आस्वाद मत्स्य खवय्यांकडून लुटला जात होता. आता मासेमारी हंगाम सुरु होत आहे. दुसरीकडे श्रावण मासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामात उपलब्ध होणाऱ्या मासळीला चांगला दर मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
...म्हणून जून आणि जुलैमध्ये मासेमारी बंद
पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते. सध्या कोकणात पाऊस देखील नाही. शिवाय समुद्राला असलेल्या उधाण सध्याच्या घडीला कमी आहे. त्यामुळे काही मासेमार समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकतात, अशी माहिती काही मच्छीमारांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.
राज्यात 15 लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात. पर्सेसिन बोटी वगळता ट्रॉलिंग आणि गिलनेटसह मच्छीमार बोटिंची संख्या तीन हजाराच्या घरात आहे. केवळ आपल्याच महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.
श्रावणा मास सुरु झाल्याने माशांच्या दरावर परिणाम
श्रावण देखील आता सुरु झाला आहे. त्यामुळे माशांच्या दरांवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. सध्या हजार ते बाराशे रुपये किलोने विकली जाणारी पापलेट 600 ते 700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. इतर माशांच्या दरांमध्ये अशाच प्रकारची तफावत दिसून येत आहे. पण श्रावण संपल्यानंतर मात्र माशांचे दर आणखी वाढू शकतात.
मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. शिवाय त्यावर प्रक्रिया करणार देखील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी वर्षाला हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते. कोकणातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातून होणार मासेमारीचं प्रमाण लक्षणीय असं आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या समुद्र हद्दीत अनेक वेळा परराज्यातील नौका देखील दिसून येतात.
गेल्या वर्षी वातावरणात होत असलेले बदल, येऊन गेलेले तोक्तेसारखं चक्रीवादळ त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला होता. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला असेल अशी अपेक्षा मच्छीमार ठेवत आहे. एक ऑगस्ट अर्थात आजपासून जरी मासेमारी सुरु होत असली तरी नारळीपौर्णिमेनंतर मात्र मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरु होईल.