Sindhudurg News : महाराष्ट्राच्या सागरी जलाक्षेत्रात मासेमारी (Fishing) करण्याचा कालावधी ठरवून दिलेला आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत राज्यात सागरी क्षेत्रात संपूर्ण मासेमारी बंद असते. 1 ऑगस्ट रोजी पारंपारिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी सुरु केली जाते तर पर्सेसिन मासेमारी (Purse Seine Fishing) 1 सप्टेंबर रोजी सुरु होते. सध्या कोकणातील (Konkan) समुद्रात अनधिकृतपणे पर्सेसिन मासेमारी केली जात आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्सेसिन मासेमारी सध्या सुरु आहे. मत्स्य विभाग त्या त्या भागात गस्ती नौका नसल्याने कारवाई करत नसल्याची कारण समोर करत आहेत.
सिंधुदुर्गात दोन पर्सेसिन बोटीवर कारवाई
राज्यात पर्सेसिन मासेमारी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत केली जाते. मात्र कोकण किनारपट्टीवर सध्या अनधिकृत पर्सेसिन मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात अनधिकृत पर्सेसिन मासेमारीला ऊत आला असून यावर मत्स्य विभागाचा अंकुश नसल्याने त्यावर कारवाई सुद्धा होत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन पर्सेसिन बोटीवर कारवाई केली असून त्यामधून 40 ते 45 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई केली जाते. बोटीवर असलेल्या माशांच्या पाच पट रक्कम आणि पाच हजार रुपये अशी कारवाई केली जात असली तरी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्ससिन मासेमारी केली जाते.
प्रजनन काळामुळे पर्सेसिन मासेमारी बंद
1 जून ते 31 ऑगस्ट हा माशांचा प्रजनन काळ असल्याने समुद्रात पर्सेसिन मासेमारीला पूर्णपणे बंदी असते. पर्सेसिन मासेमारी ही यंत्राच्या साहाय्याने केली जाते. मोठ्या बोटीवर मोठं मोठी जाळी घेऊन खोल समुद्रात जात सरसकट मासेमारी केली जाते. त्यामुळे अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पर्सेसिन मासेमारीवर निर्बंध आहेत. तरी देखील अनधिकृत पर्सेसिन मासेमारी केली जाते.
घातक पर्सेसिन मासेमारीचा भविष्यात परिणाम
पर्सेसिन मासेमारीचा कालावधी हा चार महिन्याचा असतो. याच काळासाठी परवानगी दिली जाते. मात्र सध्या अनधिकृत पर्सेसिन मासेमारी जोरात सुरु आहे. पर्सेसिन मासेमारी सरसकट केली जाते. यात लहान मोठे सर्वच मासेमारी केली जाते. याउलट पारंपरिक मासेमारी ही विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्यामुळे माशांसाठी पारंपरिक मासेमारी किफायतशीर असते. तर पर्सेसिन मासेमारी ही सरसकट केली जात असल्याने ती घातक असून त्याचे परिणाम भविष्यात होऊ शकतात.