सिंधुदुर्ग : "छत्रपती घराण्याचा अपमान करणं भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी अडचणीचे ठरेल, अशी टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. उदय सामंत यांनी आपल्या मूळ गावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले भटवाडी येथे बाप्पाचं दर्शन घेतलं. दरवर्षी पाच दिवस त्यांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. या पाच दिवसांच्या काळात त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. उद्योग मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच समंत सिंधुदुर्ग मध्ये मूळ गावी आले. 


रिफायनरी संदर्भात स्थानिक लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. पूर्वी नाणार रिफायनरीला शंभर टक्के विरोध होता. आता याचा आढावा घेतला असता 2900 एकर जमीन शेतकऱ्यांनी उद्योग खात्याकडे दिलेली आहे. जे शेतकऱ्यांचे गैरसमज आहेत ते दूर करून बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. स्थानिक आमदार राजन साळवी यांची मागणी आहे राजापूरमध्ये रिफायनरी झाली पाहिजे. बेरोजगारी दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करून उद्योग विभाग त्या भूमिकेतून पुढे जाणार आहे, अशी माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली. 


"छत्रपती संभाजी राजे यांची दलाली करणं असं म्हणणं देखील छत्रपती घराण्याचा अपमान आहे. तो माझा अपमान नाही. हा समस्त मराठा समाजाचा अपमान आहे. विनायक राऊत यांनी भावनेच्या भरात येऊन असा शब्दप्रयोग करू नये. छत्रपती घराण्याचा अपमान करणं भविष्यात अडचणीचं होऊ शकतं. उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांना देखील हे अडचणीचं होईल. छत्रपती घराण्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. दलाली करून त्यांना तिकीट मिळावं अशी त्यांची प्रवृत्ती नाही. छत्रपती संभाजी राजेंची मी दलाली केली असं विनायक राऊत यांना वाटतं असेल तर गणपती बुद्धीची देवता आहे. त्यामुळे त्यांना गणपतीने सुबुद्धी द्यावी, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. 



उदय सामंत म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्यात पर्यटनाला पूरक उद्योग व्यवसाय आले पाहिजेत. रत्नागिरीमध्ये देखील प्रदूषण विहिरीत उद्योग धंदे आले पाहिजेत. कोकणातील हजारो तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या पद्धतीचे उद्योग आणण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये जमिनीचे भाव चढ्या दराने असल्याने लोक घेत नाहीत. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यासाठी वेगळी योजना तयार करू. म्हाडाच्या धर्तीवर एक योजना करून दर कमी करण्याचा प्रयत्न केले. जिल्ह्यातील वैभववाडी, कासार्डे येथे नव्याने एमआयडीसी तयार करण्याचे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले. 


उदय सामंत म्हणाले, "आंबा वर्षभर टिकावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. रत्नागिरीमध्ये आंबा आणि काजू पार्क व्हावं यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच मरिन पार्क व्हावं यासाठी प्रयत्न करत आहे. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात लॉजीस्टिक पार्क योजना आखली जात असून त्यातून परदेशात देखील आंबा, काजू पाठवण्याची व्यवस्था केली आहे.


"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमातळावर येणारी किंवा जाणारी विमानं तांत्रिक बाबींमूळे रद्द होत आहेत. त्यासाठी मुंबईत एमआयडीसीची बैठक घेऊन विमानतळ सुस्थितीत सुरू होईल. ढगाळ वातावरणामुळे विमान उतरण्यासाठी किंवा जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी यंत्रणा बसवण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.  


शिंदेगटाच्या आमदारांना कोणत्याही प्रकारच्या बैठकीला बोलावलेलं नाही. दसरा मेळाव्याला वेळ आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. मात्र, ज्या घडामोडी मुंबईत सुरू आहेत त्या घडल्या तर आम्हालाही आनंद होईल, असे सामंत म्हणाले.