Sindhudurg News: आंबोली घाटातील 300 फूट खोल दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू, कर्नाटक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी होता तैनात
Sindhudurg News: लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election) बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून छत्तीसगड रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले एकूण पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले. लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.
गोव्याहून पर्यटन करून परतत असताना पोलिस लघुशंकेला तीन पोलिस आंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले. त्यातील मीतेलेस पॅकेरा हा दरीच्या दिशेने गेला. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास 300 फूट खोल खाली कोसळला. रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं हे त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना सुद्धा कळलं नाही. त्यांनी आंबोली पोलिस स्थानकात संपर्क केला. आंबोली पोलीस आणि आंबोली रेस्क्यू टीम घटनास्थळी जात मीतेलेश याला केवळ 30 मिनिटात खाली दरीत उतरत प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.
रेस्क्यू टीम खाली पोहोचले त्यावेळी मितीलेश थोडे शुद्धीत होते. परंतु काही वेळात त्यांनी प्राण सोडले त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला आहे. आज मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही माहिती मिळतेय का याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
आंबोली घाटात घातपात करणाऱ्याचाच झाला घात!
राड येथील वीट भट्टी व्यावसायिक आणि कामगार पुरवणाऱ्या दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवघवीवरून झालेल्या वादानंतर हाणामारीत सुशांत खिल्लारे या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अरूण माने आणि तुषार पवार यांनी सुशांत याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटाची निवड केली. हे दोघे मृतदेह कारमध्ये घेऊन कराड वरून आंबोली घाटात पोहोचले. आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या अंधारात मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर संरक्षक कठड्यावर उभे राहिले. यावेळी सुशांतचा मृतदेह खोल दरीत फेकला गेला. परंतु, तोल गेल्याने अरूण माने देखील खोल दरीमध्ये कोसळला. पर्यटांचे आकर्षण असलेला आंबोली घाट आता मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनू लागल्याने पर्यटकांमधून चिंतेचा सूर उमटत आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे.