Navy Day 2023: यंदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार नौसेना दिन; जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू, चिपी विमानतळासह सात हेलिपॅड तयार ठेवण्याचे निर्देश
Sindhudurg Fort: यंदाचा नौसेना दिनाचा सोहळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पार पडणार आहे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
Sindhudurg: छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एकमेव जलदुर्ग किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यंदाचा नौसेना दिवस याच सिंधुदुर्ग (Sindhudurg) किल्ल्यावर आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नौसेना दिवस साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी प्रशासनाने आतापासूनच काम सुरू केलं आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या आगमनासाठी बसवले जाणार हेलिपॅड
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग किल्ला, आंगणेवाडी आणि शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, कुंभारमाठ येथे एकूण सात हेलिपॅड तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चिपी विमानतळावर नाईट लँडिंग यंत्रणा बसवण्याबाबतही विकासक कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने, हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीत दिले होते.
सिंधुदुर्गात 4 डिसेंबरला होणार दिग्गज नेत्यांचं आगमन
यावर्षी भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्लावर साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासाठी मालवणमध्ये भारतीय नौसेनेची कडक सुरक्षा असणार आहे.
नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी आतापासूनच तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा वेळेत बसवून घेण्यासाठी आयआरबी या विकासक कंपनीला आदेश दिले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाणही या नियोजनाकडे स्वतः जातीनिशी लक्ष देत आहेत. या कार्यक्रमासाठी दिल्लीत देखील बैठक घेण्यात आली, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 4 डिसेंबरच्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे.
काय आहे नौसेना दिनाची पार्श्वभूमी?
1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये भारतीय नौसेनेने पाकच्या कराची बंदरावर हल्ला केला आणि भारतीय नौसेनेमुळे पाकला या युद्धात हार पत्करावी लागली होती. भारतीय नौसेनेच्या या कामगिरीची दाखल घेत 4 डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जातो. यंदा ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौसेना दिन साजरा करण्यात येत आहे, त्या सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी 25 नोव्हेंबर 1664 साली करण्यात आली. हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला मानला जातो.
हेही वाचा: