(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल, तर मनसेचा महामार्गावरील खड्ड्यांवर खोचक टोला
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांची व्यथा सांगणार एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. पण तरीही या महामर्गाची अवस्था ही जैसे थे असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या महामार्गाची व्यथा सांगणारा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमका काय आहे व्हिडिओ?
पावसाळ्यात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना देखील मोठा त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर एक तरुणाने व्हिडीओ बनवत या महामार्गाची आणि प्रवाशांची व्यथा मांडली आहे. जीवन कदम या तरूणाने मराठी युट्युबर या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. जीवनच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने तो एका ठिकाणी थांबून रस्त्याची दूरवस्था दाखवणारा व्हिडिओ ब्लॉग करत होता. त्याचवेळी या मार्गावरुन जाणाऱ्या दुसऱ्या गाडीचा देखील टायर पंक्चर झाला. या महामार्गावर पडलेले खड्डे त्याने या व्हिडीओमध्ये दाखवले आहेत.
मनसेचा खोचक टोला
या व्हिडीओ व्हायरल होत असताना मनसेनही याबाबत ट्वीट करत खोचक टीका केली आहे. "एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतोय कसा गं... चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा !" असं ट्वीट मनसेने केलं आहे. जीवन याने शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देत मनसेने हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे.
आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे असं म्हणतो पण कोकणात जाताना भ्रष्टासुरामुळे वाटसरूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मराठी युट्युबर जीवन कदम यांना आलेला अनुभव. #खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे : पहा आणि थंड बसा ! pic.twitter.com/Wp1rHAShuc
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 4, 2023
नितीन गडकरींची राज्यसभेत खंत
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी खंत व्यक्त केली आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल असं म्हणत त्यांनी या महामार्गाच्या कामावर भाष्य केलं आहे. तसेच या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन देखील त्यांनी या अधिवेशनात दिलं आहे.
या महामार्गावरील पनवेल ते कासू या 84 किमी रस्त्याचं काम सुरु आहे. तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील 42 किमीचे काम वेगाने सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील बारा वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. तर अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदा तरी कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांच्या प्रवासातील विघ्न दूर होणार का हा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.