Sangli News: रस्त्याच्या बाजूला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या नादुरुस्त डम्परमुळे 12 तासांत दोन भीषण अपघात; दोघांचा जीव गेला
Sangli News: विटा ते आळसंद रस्त्यावर खंबाळे गावच्या हद्दीतील चक्रधारी यंत्रमाग कारखान्याजवळ डम्पर (एमएच-10-सीआर-8707) रस्त्याच्या बाजूला नादुरुस्त अवस्थेत उभा होता.

Sangli News: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या नादुरुस्त डम्परमुळे 12 तासांत दोन भीषण अपघात झाले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच डम्परमुळे हे दोन्ही अपघात झाल्याने रस्ते सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अवघ्या 12 तासात एकाच डम्परमुळे दोन अपघात
विटा ते आळसंद रस्त्यावर खंबाळे गावच्या हद्दीतील चक्रधारी यंत्रमाग कारखान्याजवळ डम्पर (एमएच-10-सीआर-8707) रस्त्याच्या बाजूला नादुरुस्त अवस्थेत उभा होता. 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता महेंद्र पांडुरंग शितोळे (वय 35, रा. शिवाजीनगर, विटा) हे दुचाकीवरून (एमएच-10-डीई- 7699) विटाकडे जात होते. त्यावेळी शितोळे यांची दुचाकी थेट रस्त्याकडेला उभा असलेल्या डम्परच्या मागील उजव्या भागावर आदळली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचदिवशी साडे आठ वाजता पुन्हा त्याच ठिकाणी आळसंदहून विट्याकडे येत असलेली चारचाकी (एमएच-10-एजी- 2734) अंधारात डम्पर न दिसल्याने त्याच डम्परवर पाठीमागून आदळली. त्यानंतर ही चारचाकी विट्यावरून आळसंदकडे जाणाऱ्या मोटारीला (एमएच-16-डीजी- 5670) धडकली. या धडकेत चारचाकी चालक आस्लम गुलाब मुलाणी (रा. आळसंद) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील वहिदा आस्लम मुलाणी, अल्ताफ आस्लम मुलाणी आणि तन्जिला सरफराज मुजावर (सर्व रा. आळसंद) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात मोटार आणि चारचाकी दोन्हीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या दोन्ही अपघातांची नोंद विटा पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी डम्पर (एमएच-10 सीआर 8707) च्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
डम्परला वाहनचालकाने निष्काळजीपणे नादुरुस्त अवस्थेत उभा केले होते. तसेच डम्परवर पार्किंग लाइट, रेडिएटर चेतावणी किंवा दिशादर्शक फलक लावलेलेही नव्हते. यामुळेच दोन अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, म्हणून प्रशासनाने रस्त्यावर नादुरुस्त वाहने उभी करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या
























