Sangli Mass Murder : म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप
Sangli Mass Murder : वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे.
Sangli Mass Murder : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस तपासाला गती आल्याने मोरे कुटुंबियांचे मारेकरी तसेच मारेकऱ्यांना मदत करणाऱ्यांपर्यंत पोहोचता आले.
वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे. राज्यभरात मांत्रिकांच्या टोळ्या कार्यरत असून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली. म्हैसाळमधील हत्याकांडामागे मांत्रिकांची टोळी कार्यरत आहे. वनमोरे कुटुंबाकडून मिळालेले कोट्यवधी रुपये या टोळीला देण्यात आल्याची माहिती आहे. सावज शोधून फसवणे, त्यांच्याकडून पैशांची वसुली करणे आणि पैशांचे वितरण करणे अशी साखळी कार्यरत आहे. तिची व्याप्ती मोठी असून पोलिसांनी सखोल तपासाद्वारे पाळेमुळे खोदून काढावीत, अशी मागणी त्यांनी केली.
गुप्तधनाच्या आमिषाने मांडूळ, कासव यांची तस्करीही केली जाते. पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा केला जातो. याचा कायमचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, असे आवाहन नितीन चौगुले यांनी केले. सोलापूरच्या मांत्रिकाने वनमोरे कुटुंबातील नऊजणांचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. यामुळे बुवाबाजी आणि अंधश्रद्धेमुळे होणारी आर्थिक लूट प्रकर्षाने चर्चेत आली आहे. याच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी चौगुले यांनी केलीय.
हनी ट्रॅपद्वारे तरुणांना ब्लॅकमेलचे प्रकार वाढले
हनी ट्रॅपद्वारे तरुणांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारावरही शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आवाज उठवणार आहे. बुवाबाजीतून व्हॉट्सअॅपवरून कोणीतरी तरुणी संभाषण साधते. पुढील टप्प्यात तरुणाशी अश्लील संभाषण व चित्रफितींची देवाणघेवाण होते. ते उघड करण्याची धमकी देऊन लाखो रुपये वसुल केले जातात. अनेक मोठमोठे व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांसह सर्व कुटुंबांनाही अशा हनी ट्रॅपद्वारे लुबाडण्यात आले आहे. पैसे दिले नाहीत, तर अश्लील चित्रण फेसबुकवरुन फ्रेण्ड लिस्टमध्ये प्रसारित करण्याची धमकी दिली जाते. सर्वसामान्यांना लुटणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार आहोत, असे नितीन चौगुले यांनी म्हटलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या