Sangli : सांगली मिरजेत महापालिकेने विनापरवाना आणि खासगी जागेत जाहिरात फलक शुल्क न भरता उभारलेल्या डिजिटल फलकावर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये खासगी जागेतील जाहिरात फलक शुल्क न भरलेले डिजिटल फलकही उतरवण्यात आले आहेत. जाहिरात फलक शुल्क न भरल्याने ही कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने सांगली, मिरजेत कारवाई करण्यात येत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर अनेक डिजिटल फलक हे विनापरवाना उभारले जात आहेत. यामध्ये राजकीय पक्ष, संघटना यांचे बॅनर झेंडे अन्य फलक, जाहिरात कंपन्यांचे फलक तसेच अनेक व्यावसायिकांनी, दुकानदार यांनी आपल्या व्यवसायाच्या दर्शनी बाजूस महापालिकेच्या परवानगी विना आणि कोणतेही जाहिरात शुल्क न भरता जाहिरात फलक उभारले आहेत.
फौजदारी दाखल करण्याचे आदेश
या विनापरवाना फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशा फलकावर कारवाई करीत फौजदारी दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मालमत्ता विभागासह सहायक आयुक्तांना दिले होते. या आदेशानुसार गुरुवार सकाळपासून सांगली आणि मिरजेत सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना उभारलेले आणि खासगी जागेत जाहिरात शुल्क न भरता लावण्यात आलेले जाहिरात फलक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उतरवले आहेत.
यामध्ये सांगलीत सहायक आयुक्त नितीन शिंदे यांच्या पथकाने बायपास रस्ता ते कॉलेज कॉर्नर या मार्गावरील विनापरवाना आणि जाहिरात शुल्क न भरलेली 50 हुन अधिक जाहिरात फलके उतरवली आहेत तर मिरजेत सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या टीमकडून विनापरवाना मोठे 6 जाहिरात फलक आणि छोटे 80 बोर्ड उतरवले आहेत.
ज्या जाहिरात फलक धारकांनी खासगी जागेत आपले जाहिरात फलक उभारले आहेत. त्यांनी त्या जाहिरात फलकाचे जाहिरात शुल्क महापालिकेकडे रीतसर भरावे आणि अन्यथा अशा खासगी जागेतील आणि सार्वजनिक जागेतील जाहिरात फलकावर कायदेशीर कारवाई करीत फोजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा सहायक आयुक्त नितीन शिंदे यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या