सांगली : वेळेत मान्सून दाखल होईल या अंदाजाने कृष्णा नदीतील सांगली (Sangli) बंधाऱ्याचे बरगे पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यात काढल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. बरगे हटवल्याने बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरच सांगली शहरात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या पंपाचा उपसा कमी होत आहे. पाणी पातळी खालावल्याने महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या पंपाला पाणी पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे सांगली, कुपवाड शहरातील अनेक भागात मागील काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली
मान्सून लांबत चालल्याने कृष्णेची पाणी पातळी खालावली आहे. नदीपात्रामध्ये आठवडाभर पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीतील सांगली बंधाऱ्याच्या फळ्या पाटबंधारे विभागाकडून काढल्या आहेत. त्यामुळे नदीची पाण्याची पातळी कमी झाली असून महापालिकेच्या पंपाचा उपसा कमी होत आहे. औद्योगिक महामंडळाच्या यांनाही पाणीपुरवठा केंद्राचे तीन स्ट्रेनरपैकी दोन स्ट्रेनर उघडे पडले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
सध्या कृष्णा नदीपात्रात शहराला आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. या काळात पाऊस न झाल्यास कोयना धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. पाणी पातळी खालावल्याने शहरातील नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. आधीच पाणीपुरवठा बाबत नागरिकांच्या तक्रारी असताना त्यात टंचाईने डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
वेळेत पाऊस सुरू होईल या अंदाजाने सांगलीच्या बंधाऱ्यावरील बरगे मागील आडत काढण्यात आले. मात्र मान्सून रेंगाळल्याने बंधाऱ्यातून पाणी वाहून गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कृष्णा नदी पात्रातून टेंभू आणि ताकारी या सिंचन योजना साठी पाणी उपसा सुरू आहे. ताकारी योजना पुढच्या काही दिवसात बंद होईल आणि त्यानंतर कृष्णा नदीत पाणी वाढण्यास मदत होईल असं पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आलं आहे.