Sangli : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या त्या कर्मचाऱ्याने अखेर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागत आपल्याकडून झालेल्या प्रकारावर खेद व्यक्त केला आहे. शिवाय बजाज फायनान्स कंपनीने सुद्धा मोठी कारवाई करून दिल्लीमधील बाबा हरिदास कम्युनिकेशन या संबंधित एजन्सीचे कंत्राट रद्द केलं आहे. 


बजाज फायनान्सने वसुलीसाठी नेमलेल्या दिल्लीमधील बाबा हरिदास कम्युनिकेशन एजन्सीचा हा कर्मचारी होता. मनसेने याप्रकरणी सांगलीतील बजाज फायनान्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. यावर बजाज फायनान्सने या आंदोलनाची तत्काळ दखल घेत बाबा हरिदास कम्युनिकेशनच्या त्या कर्मचाऱ्याला तंबी देत माफी मागण्यास सांगितले आणि कंत्राटही रद्द करून टाकले. 


काय आहे संपूर्ण प्रकरण ?


एजन्सीच्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एका कर्जदाराशी फोनवर बोलताना छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती पैसे सोडून गेला होता का ? शिवाजी आता पैसे भरणार का ? अशी भाषा संबंधित कर्मचाऱ्याने कर्जदाराशी बोलताना वापरली होती. तसेच महिलांविषयी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी गंभीर दखल घेऊन सांगलीतील जिल्हा परिषदेसमोरील बजाज फायनान्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. 
 
जोपर्यंत तो संबंधित एजन्सीचा कर्मचारी माफी मागत नाही व बजाज फायनान्स कंपनी त्या संबंधित एजन्सीचे कंत्राट रद्द करत नाही तोपर्यंत कार्यालय उघडून देणार नाही, जर उघडले तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा सावंत यांनी दिला होता. त्यावर बजाज फायनान्स कंपनीने यावर मोठी कारवाई करून दिल्लीमधील संबंधित एजन्सीचे कंत्राट रद्द केले व त्या कर्मचाऱ्याने महाराजांची महिलांची व अखंड महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या