Sangli : बजाज फायनान्सने वसुलीसाठी नेमलेल्या दिल्लीमधील एका एजन्सीच्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एका कर्जदारांशी फोनवर बोलताना छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती पैसे सोडून गेला होता का? शिवाजी आता पैसे भरणार का? अशी भाषा संबंधित कर्मचाऱ्याने कर्जदारांशी बोलताना वापरली. या प्रकरणाची मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी गंभीर दखल घेत आज सांगलीतील जिल्हा परिषदेसमोरील बजाज फायनान्सच्या कार्यालयात जात कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कर्मचाऱ्यांनाच कार्यालयाला टाळे ठोकायला भाग पाडले.
जोपर्यंत तो संबंधित एजन्सीचा कर्मचारी माफी मागत नाही आणि बजाज फायनान्स त्यासंबंधित कंपनी सोबतचे कॉन्ट्रॅक्ट जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत हे कार्यालय उघडू देणार नाही, जर उघडले तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या समोरील बजाज फायनान्स कंपनीतून कर्ज घेतलेल्या ग्राहकाला कर्ज वसुलीसाठी वसुली अधिकाऱ्याने कॉल केला असता कर्जदाराने कर्ज परतफेड करता येत नाही, मी थोडे थोडे करून भरतो असे सांगितले असता तुला कर्ज शिवाजीने दिले होते का? शिवाजी कोण विचारले असता महाराज शिवाजी असे बोलण्यात आले. त्यानंतर कर्जदाराने कर्ज मी घेतले आहे , महाराजांना मध्ये का आणतो तरीही तुझा छत्रपती देणार का ? असे वारंवार बोलण्यात आले.
छत्रपतींचा अवमान, तुझ्या बायकोचे कुंकू पुसून कर्ज फेड असही तो बोलला
मुळात राजेंबद्दल एकेरी भाषेत बोलून छत्रपतींचा अवमान केला. त्यानंतर तुझ्या बायकोचे कुंकू पुसून कर्ज फेड असही तो बोलला. त्यामुळे एकतर महाराजांचा अवमान व महिलांचाही अपमान केला आहे. त्यामुळे आज मनसैनिक जाब विचारायला गेले असता तो वसुली अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. म्हणून तो जोपर्यंत माफी मागत नाही, त्या एजन्सीला काढून टाकत नाही तोपर्यंत ऑफिस बंद ठेवायचं असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगत बजाज फायनान्सचे कार्यालय बंद केलं.
यावेळी उपस्थित जिल्हा सचिव जमीर सनदी, शहर अध्यक्ष दया मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, सोनू पाटील, कुमार सावंत, प्रवीण देसाई, राजू पाटील, संजय खोत यांच्यासह कार्येकर्ते उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या