Shambhuraj Desai on Sanjay Raut : आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सुतोवाच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देण्याचा ठरवलं आहे, त्या दृष्टीने आमचं काम सुरू असून आमचं काम बोलेल, असा टोलाही त्यांनी लगावला. ते सांगलीच्या विटा येथे शिंद गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिर प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझं खातं राज्याला उत्पन्न देणारं तिसऱ्या क्रमांकाचे मोठे खातं आहे. मागील दोन वर्षे कोविडमध्ये गेल्याने थोडा महसूल कमी झाला. आता एक महिना दीड महिना शिल्लक आहे, मला जे उद्दिष्ट दिलं आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राची तिजोरी भरण्याचं काम आम्ही नक्की करू.
त्यावेळी टीव्ही चॅनेल बंद होतो
खासदार संजय राऊत सकाळी बडबडताना किती लोक टीव्ही चॅनल बंद करतात, याचा सर्व्हे करा, राऊत बोलायला लागले, की लोक चॅनल बदलतात हा आपला अनुभव आहे, यावरून ओळखा, असा टोला शंभूराजे देसाई यांनी लगावला.
शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा प्रकरणाचा तपास सुरू
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, आरोपीला अटक केलेली आहे. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा खून कोणी केला, कोणत्या पार्श्वभूमीवर झाला, करायला कोणी लावला याबाबत मुख्यमंत्री साहेब हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेता येते का? यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा हातात घ्यायचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला शोधून काढून पोलिस खात्यामार्फत नक्की शिक्षा केली जाईल, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
मुख्यमंत्री गरजू रुग्णांचे 'एकनाथ'
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटामध्ये हजारो गरजू रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. अनिल बाबर म्हणाले, विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सतत टीका करतात. मात्र, मुख्यमंत्री राज्यातील गरजू रुग्णांसाठी बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत करत असतात. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री हे गरजू रुग्णाचे एकनाथ आहेत. दुसरीकडे, सुमारे दीडशेहून अधिक आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका व 500 स्वयंसेवक या महाआरोग्य शिबिरासाठी कार्यरत होते.
इतर महत्वाच्या बातम्या