Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) पलूस तालुक्यातील (Palus Taluka) बांबवडेमधील विजय नाना कांबळे (वय 62) यांचा अपघाती मृत्यू नव्हे,  तर सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 12 एकर जमिनीच्या वादातून पलूस येथील सुनील केशवराव घोरपडे (वय 52) व अभयसिंह मोहनराव पाटील (वय 40) यांनी कांबळे यांना मारण्यासाठी तिघांना पाच लाखांची सुपारी दिली होती. पलूस तहसील कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे जाणाऱ्या पलुस पोलीस ठाण्यासमोर 20 जानेवारी रोजी वृद्ध विजय नाना कांबळे यांना पाठीमागून इनोव्हा कारची जोराची धडक देत अपघात झाल्याचा बनाव करत खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.


संग्राम राजेंद्र पाटील (वय 22, रा. भवानीनगर,वाळवा), रोहन रमेश पाटील (24 रा. घोगाव), रुतीक भुपाल पाटील (22 रा.घोगाव), सुनिल केशवराव घोरपडे  (रा. पलूस), अभयसिंह मोहनराव पाटील (40 रा. पलूस) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना पलूस न्यायालयात हजर केले असता 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.


इनोव्हाने दिली मागून धडक 


याबाबत अधिकची माहिती अशी की, मयत कांबळे 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या अज्ञात इनोव्हाने जोराची धडक देत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत पलुस पोलिसांनी विजय कांबळे यांना उपचाराकरता मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर अपघात प्रत्यक्ष पाहणारे जितेश सुरेश बनसोडे यांनी तक्रार दाखल केली होती. मिरज सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचारदरम्यान कांबळे यांचा 21 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता.


पोलिस ठाण्यासमोर अपघात घडल्याने आव्हान 


सदर घटना पोलिस ठाण्यासमोर झाल्याने गुन्हेगाराला शोधणे पोलिसांसाठी मोठी जबाबदारी होती. अपघात की खून हे स्पष्ट करण्यासाठी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांनी गुन्हा घडल्यापासून पोलीस ठाण्याचा, कुंडलकडे जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली होती. यामध्ये एक इनोव्हा गाडी बिगर नंबरची गेल्याचे स्पष्ट झाले. वाहनाचा शोध घेण्यासाठी सांगली ,कोल्हापूर येथे पथके पाठवली. तपासात इनोव्हा गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


त्यानंतर पोलिसांनी शोध घेवून सदर वाहनाचा मालक निष्पन्न केला व त्यावरुन वाहनाचा नंबर (एमएच-09-डीएम 4041) असे स्पष्ट झाले. वाहन मालकाकडे तपास केला असता त्यांनी सदरचे वाहन सन 2021 मध्ये इस्लामपूर हद्दीतील भवानीनगर येथील संग्राम राजेंद्र पाटीलला 2 लाखांना गहाण दिले होते असे निष्पन्न झाले.


संग्राम पाटील ताब्यात घेताच बनाव उघडकीस 


संग्रामला पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला असता पलुस येथील सुनिल घोरपडे, अभयसिंह पाटीलशी संपर्क असल्याचे  तांत्रिक पुराव्यावरुन स्पष्ट झाले. मयत कांबळे तसेच अभयसिंह पाटील व सुनिल घोरपडे यांचेत बांबवडे येथील 12 एकर जमिनीचा वाद होता.कांबळे यांच्याकडे कुळाची जमीन होती. जमिनीच्या वादातून तसेच मयत कांबळे खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून त्यांनी संग्राम पाटीलला मयत कांबळेला उचलून नेणे किंवा वाहनाची धडक देणे यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिली होती.


त्यानुसार संग्राम पाटील व त्याचे मित्र रुतीक पाटील, रोहन पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मयत कांबळे हे कोर्टात कामासाठी आल्यानंतर पाळत ठेवून होते. कोर्टातून काम आटोपून पायी चालत जात असताना त्यांना इनोव्हा कारने पाठीमागून धडक देत खून केला. त्यामुळे हा अपघात नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले.


इतर महत्वाच्या बातम्या