सांगली : सासरचे बायकोला नांदवायला पाठवत नाही म्हणून जावयाने सासऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सांगलीच्या (Sangli Crime) जत तालुक्यातील दरीबडची येथे मध्यरात्री घडली आहे.  याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरारी आहे.


जत तालुक्यातील दरीबडची येथील तेजश्री हिचे लग्न सुमारे चार वर्षापूर्वी कर्नाटकच्या अथणी येथील ऐगळी गावातील सचिन रुद्राप्पा बळोळी याचाशी झाला. लग्नानंतर एका महिन्यानंतर जावई सचिन आणि मुलगी तेजश्री यांच्यात घरगुती कारणावरुन वाद सुरू झाले.  जावई सचिन हा मुलगी तेजश्रीवर चारित्र्याचा संशय घेत वारंवार मारहाण करत होता. 


दीड वर्षापूर्वी गावातील लोक आणि मुलीचे वडील आप्पासो यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जावई सचिन याने मुलगी तेजश्री हिला संशयावरुन मारहाण करणे, शिवीगाळ करणे, त्रास देणे सुरुच ठेवले होते. त्या त्रासाला कंटाळून सुमारे एक वर्षापासून मुलगी तेजश्री ही माहेरी दरीबडची गावी राहण्यास आली होती. त्यानंतर जावई सचिन हा  घरी येऊन मुलगी नांदायला पाठवा म्हणुन घरासमोर येऊन वाद करत होता. तसेच त्याने अथणी कोर्टात मुलगी नांदण्यास पाठवावी म्हणून केस केली आहे. तर मुलीच्या आई वडिलांनी जत कोर्टात त्यांचा घटस्फोटाकरता अर्ज केला आहे.  पाच महिन्यापूर्वी जत कोर्टात  जावई सचिन यांनी मुलगी तेजश्रीला 'तु नांदायला चल, नाही आलीस तर तुला जिवंत ठेवत नाही 'अशी  दमदाटी केली होती. त्यावेळी मुलीने जत पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार दिली होती. 


शुक्रवारी शेतातील ऊस तोडीचे काम सुरु होते. तेथे मुलीचे वडील आप्पासो शेतात गेले होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास आप्पासो यांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी जावई सचिन रुद्राप्पा बळोळी, त्याचा भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी व दोन अनोळखी इसम हातात धारधार कोयते घेऊन शेतात आले.  आप्पासो यांच्या डोक्यात, मानेवर मारहाण करत असताना बॅटरीच्या उजेडात दिसले. त्यावेळी  लोक आलेले पाहून त्यांनी चारचाकी गाडीतून पळ काढला. डोक्यात, मानेवर, कानावर, चेह-यावर, हातावर मारहाणीच्या खुना दिसल्या. या  खुनाबाबत  मयत याच्या पत्नीने जबाब दिला आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :