Sangli Politics : सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटामध्ये काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. खासदार संजयकाका पाटील यांनी अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला तर संजयकाकांनीच स्वगृही यावं असं म्हणत देशमुख यांनी टोला लगावला.
विटा इथे गुरुवारी (13 जानेवारी) नेचर केअर फर्टिलायझर्सचे संस्थापक जयंत वामन तथा बाबा बर्वे (Baba Barve) यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल कृतज्ञता सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अमित देशमुख आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील एकत्र आले होते. यावेळी सुरुवातीला भाजपचे संजयकाका पाटील यांनी अमित देशमुखांना भाजपात येण्याचा आग्रह केला. यावर पलटवार करताना अमित देशमुखांनी लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे तिथेच राहणार आहे, मला बोलवणाऱ्यांनी स्वतः स्वगृही (काँग्रेसमध्ये) यावं, असा टोला भाजपच्या नेत्यांना लगावला.
तुम्हाला भाजपमध्ये येण्याचा आग्रह न करणं यथोचित होणार नाही : संजयकाका पाटील
काल तुमची न्यूज टीव्हीवर ऐकली. संभाजी पाटलांनी काही वक्तव्ये केली की लातूरचे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. आजचा कार्यक्रम हा जयदेव बर्वे यांनी घेतलेला आहे. ज्यांच्या वाड्यामध्ये साठ वर्षांपासून संघाची शाखा लागते त्यांच्या नसानसात संघाच्या माध्यमातून भाजपचं काम आहे. अशा कार्यक्रमाला तुम्ही आलाय आणि मी तुम्हाला त्याबाबतीत आग्रह न करणं हे यथोचित होणार नाही. त्यामुळे भाजपचा खासदार म्हणून तुम्हाला आग्रह करतो, असं संजयकाका पाटील म्हणाले.
मला बोलवणाऱ्यांनी स्वगृही यावं : अमित देशमुख
यावर अमित देशमुख म्हणाले की, "लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे तिथेच राहणार आहे. मला बोलवणाऱ्यांनी स्वतः स्वगृही (काँग्रेसमध्ये) यावं. सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे, किंवा तसे तूर्त तरी म्हणावे लागत आहे. हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्य न्यायालयात सुनावणी साठी प्रलंबित आहे आणि आता कोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा असं म्हणत अमित देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात हे तिसरे सरकार आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे होते तर तिसरे सरकार हे सध्या सत्तेत आहे आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. काहीही सांगता येत नाही. महाराष्ट्रात निवडणुका होतच नाहीत. निवडणुका कधी होतील हे ही सांगता येत नाही."
VIDEO : Amit Deshmukh Full Speech : भाजपात जाण्याच्या चर्चेला काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांचा पूर्णविराम
संबंधित बातमी