Shahapur Crime News: आपल्या गरोदर पत्नीचा गर्भपात (Abortion) करण्यासाठीच सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेल्याच्या संशयातून जवायानं सासऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला आहे. सोनोग्राफी सेंटरमध्येच हा प्रकार घडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हल्लेखोर जावयावर शहापूर पोलीस ठाण्यात (Shahapur Police Station) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद सुदाम निचिते असं गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर जावयाचं नाव आहे. तर शशिकांत एकनाथ दुभेळे (वय 52) असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सासरे हे शहापूर तालुक्यातील दहिगाव गावाचे पोलीस पाटील आहेत. 


शहापूर तालुक्यातील दहिगावचे पोलीस पाटील शशिकांत दुभेळे यांची मुलगी प्रज्ञा हिचा विवाह 26 एप्रिल 2020 रोजी शहापूर तालुक्यातील पाषाणे गावात राहणाऱ्या शरद निचिते याच्याशी झाला. मात्र पती शरद हा नेहमीच आपली पत्नी प्रज्ञा हिला मारहाण करायचा. कालांतरानं प्रज्ञा गरोदर राहिली. शरद त्यातही प्रज्ञाला मारहाण करायचा. शरद करत असलेल्या मारहाणीमुळं प्रज्ञा सतत तणावात राहायची. या सर्व गोष्टींचा परिणाम प्रज्ञाच्या पोटातील बाळावर होईल, अशी भिती तिचे वडील आणि शरदचे सासरे शशिकांत यांना वाटायची. त्यामुळे 7 जानेवारी रोजी शशिकांत दुभेळे हे आपल्या मुलीसह आरोपी जवाईला घेऊन शहापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यातच आरोपी पतीला सासरे आपल्या पत्नीचा गर्भपात करत असल्याचा संशय आला. त्यामुळे रागाच्या भरात शरदनं सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी नातेवाईकांसमोरच दिली होती. मात्र त्यावेळी नातेवाईकांनी मध्यस्थी करुन दोघांचे वाद सोडवले होते. 
 
त्यानंतर 9 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास आपल्या गरोदर मुलीला घेऊन शशिकांत पुन्हा सोनोग्राफी करण्यासाठी शहापूर शहरातील पंडित नाक्यावर असलेल्या आस्था सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले होते. दुसरीकडे आरोपी जावयाला पत्नीचा गर्भपात करण्यासाठीच सासऱ्यांनी तिला सोनोग्राफी करण्यासाठी नेल्याचा पुन्हा संशय आल्यानं माथेफिरू जावई शरद निचिते हा थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये पोहोचला. त्यानंतर त्यानं सासऱ्यांशी वाद घालत माझ्या पत्नीला गर्भपात करण्यासाठी घेऊन आला का? असा सवालही केला. या गैरसमजातून शरदनं सासऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला. 


दरम्यान, शरदनं हल्ला केल्यानंतर कोणीच भाडणं सोडविण्यासाठी येत नसल्याचं पाहून जीव वाचविण्यासाठी शशिकांत यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये धाव घेतली. मात्र या हल्ल्यात सासऱ्यांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भादवि कलम 324, 504, 506 अंतर्गत हल्लेखोर जावायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत.