Sangli Dead Fish : सांगली जिल्ह्यातील नागठाणे ते आमणापूर कृष्णा नदीच्या पात्रालगत लाखो मृत माशांचा खच पडला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन  पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे. नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे.


दरम्यान हे मासे पकडण्यासाठी सांगलीत नदीवर नागरिकांनी रात्री अंधारातही प्रचंड गर्दी केली होती. परंतु नदी पात्रात मृत झालेले मासे खाण्यासाठी धोकादायक असल्याने ते खाऊ नयेत, असं आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलं आहे.




दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत 
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदीचं पात्र दुथडी भरुन वाहत आहे. याचाच फायदा घेत कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता तसेच सोडून दिले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे पाणी नदीत सर्वत्र पसरल्यानंतर लाखो मासे आणि खेकडे मृत्युमुखी पडले आहेत. परिणामी नदीकाठी मृत माशांचा आणि खेकड्यांचा खच पडला असून नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे. 


कुठे कुठे मृत माशांचा खच?
कृष्णा नदीकाठी असलेल्या पलूस तालुक्यातील नागठाणे, आमणापूर, भिलवडी आणि सांगलीत घाटापर्यंत सर्वत्र या मृत माशांचा ढीग आढळत आहेत. असंख्य मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. यापूर्वीही नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने कृष्णा नदीत शेकडो मासे मृत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया न करता रसायनमिश्रित पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा नदी पात्र परिसरामध्ये होत असलेल्या सलगच्या पावसामुळे पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास 18 फुटापर्यंत गेली आहे. तरी अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केलेले नाही तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसावर ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण पन्नास टक्के भरले आहे.


संबंधित बातमी


साखर कारखान्यांतील मळी मिश्रीत पाण्यामुळे कृष्णा नदीत मृत माशांचा खच