Maharashtra Bendur : आज महाराष्ट्र बेंदूरचा सण आहे. हा सण पश्चिम महाराष्ट्रमध्ये साजरा करण्यात येतो. बैलांप्रती आदर व्यक्त करणारा दिवस आणि सण म्हणून बेंदूर सणाची ओळख आहे. आज बैलजोडींना सजवण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. बैलजोडीच्या साहित्याचे दर देखील वाढलेले आहेत. त्यामुळे या दरवाढीचा शेतकऱ्यांना देखील फटका बसतो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज महाराष्टीय बेंदूर साजरा करण्यात येतो.
बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा सण म्हणून या सणाची ओळख आहे. हा सण सांगली जिल्ह्यात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात येतो. आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो. बैलांना त्यांनी शेतात राबून केलेल्या अनंत उपकाराबद्दल कृतज्ञतापूर्वक पुजन केले जाते. बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून ईमान इतबारे साथ असते ती बैलांची. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न या सणातून केला जातो.
बैलाला हळद, तसेच तेलाने त्यांचे जू ओढणारे खांदे चोळून स्नान घातले जाते. शिंगे घोळून त्यावर रंगरंगोटी करुन बेगड देखील लावले जाते. त्यांची येसण, कड्या, धारक्या जून्या काढून नवीन घालतात. त्यांना पुरणपोळी चारत पंचारतीने ओवाळून मिरवणूक काढली जाते.
आजच्या दिवशी जनावरांना केवळ हिरवा चाराच दिला जातो. अगदीच दुष्काळ असेल तर त्यात बदल होतो. अन्यथा जनावरांना या दिवशी हिरवा चारा देण्यावर भर दिला जातो. बैलांना आंघोळ घातल्यानंतर त्याच्या अंगावर रंगांचे पट्टे ओढले जातात. काही लोक त्याच्या अंगावर रंगीत छापही उठवतात. नंतर त्याच्या पाठीवर झूल घालून शिंगांना बेगडी लावतात. त्याच्या डोक्यावर बाशिंग आणि गळ्यात चाळ घातली जाते. त्यानंतर बैलांची मिरवणूक काढली जाते.
आषाढी एकादशीपासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण-उत्सवांना सुरुवात होते. देशभरातील अनेक भागात वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात. यापैकी महाराष्ट्रात वेगळे महत्त्व प्राप्त असणार सण म्हणजे बेंदूर. या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या:
- Sangli : बैलांच्या मानेवरील ओझं होणार हलकं; इस्लामपूरच्या आरटीआय विद्यार्थ्यांनी बैलपोळ्याची दिली अनोखी भेट
- Sangli : इस्लामपूरच्या RTI विद्यार्थ्यांची कमाल; रोलिंग सपोर्टरची निर्मिती करत बैलपोळ्याची दिली अनोखी भेट