Sangli News : जत तालुक्यातील अमृतवाडीतील बेपत्ता असलेल्या चिमुरड्या भावंडांचे पडक्या विहीरीत मृतदेह सापडले आहेत. सुलोचना आनंद गवळी आणि इंद्रजित आनंद गवळी अशी त्यांची नावे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. मात्र, आज (ता. 12 फेब्रुवारी) दुपारी त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका पडक्या विहिरीत दोघांचे मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदन करून दोन्ही मुलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. दरम्यान, विहीरीत पडून या मुलांचा मृत्यू झाला की अन्य काही कारणांनी हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येईल.
पोलिसांकडून मुले गायब असल्यापासून दोन दिवस घराला लागून असलेली विहीर, शेततळ्यात शोध घेत होते. तिथे काहीच हाती न लागल्याने कुणी मुलाचे अपहरण केलं आहे का? अशी शंका येऊ लागली. मात्र, पोलिसांना आज दुपारपासून घरापासून काही अंतरावर असलेल्या पडक्या विहिरीतही शोध घ्यावा असे वाटले. नेमक्या याच पडक्या विहिरीत मुलाचे मृतदेह सापडले. मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या शोधमोहिमेत पोलिसांना काहीही हाती न लागल्याने या दोन चिमुकल्यांच्या गायब होण्याचे गूढ वाढले होते.
सुलोचना आनंद गवळी आणि इंद्रजित आनंद गवळी अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. जत पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी 2 दिवस शोध घेऊनही ती सापडली नव्हती. याबाबत वडील आनंदा गवळी यांनी जत पोलिस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. हे कुटुंब ज्या ठिकाणी राहते त्या घराजवळ 60 फूट व्यासाची विहीर आहे. खेळताखेळता ही मुले विहीरीत किंवा शेततळ्यात पडली असल्याची शक्यता गृहित धरून विहीरीत, शेततळ्यात शोधमोहीम घेण्यात आली होती.
पत्नी रुग्णालयात, घरी आल्यानंतर मुलं दिसेनात
जत येथील द्राक्ष बागायतदार दीपक हत्ती यांच्या शेतात आनंद गवळी हे तीन वर्षांपासून मजूर म्हणून काम करत आहेत. ते या ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह राहतात. आनंद यांची पत्नी आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे सुलोचना व इंद्रजीत ही त्यांची दोन मुले घरीच होती. आनंद गवळी हे घरी गेले त्यावेळी मुले घरात दिसली नाहीत. त्यांनी परिसरात त्यांचा शोध घेतला; पण ती सापडली नाहीत. यामुळे गवळी यांनी जत पोलिस ठाण्यात याबाबत गुरुवारी रात्रीच फिर्याद दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या