Sangli News : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना शेतकऱ्यांनी ब्राँझपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली आहे. धातूची ही बैलगाडी राजस्थानमधील चित्तोडगडहून विमानाने पुणे आणि तेथून विटा शहरात शेतकऱ्यांनी आणली. आमदार बाबर यांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचे पाणी विटा शहरातील शिवाजीनगर परिसरातील शेतीला मिळाले. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. याची कृतज्ञता म्हणून एक शेतकरी आमदार म्हणून त्यांना शेतकऱ्यांनी ही बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. सध्या ही आमदारांना भेट दिलेली बैलगाडीची प्रतिकृती सर्वाधिक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे. 


ही बैलगाडी साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब आहे. बैलगाडीची प्रतिकृती तब्बल 16 किलोची आहे. ही बैलगाडी विमानाने पुण्यात आणण्यात आली. सत्कार समारंभात ही बैलगाडी आकर्षण ठरली होती. ही भेटवस्तू स्वीकारल्यानंतर आमदार बाबर थोडे भावूकही झाले. ही बैलगाडी लाकडाची नाही तर धातूची आहे. राजस्थानातील उदयपूर, मेवाड, चित्तोडगड हा परिसर जसा ऐतिहासिक आहे. तसेच या ठिकाणी कोरीव, रेखीव काम केलेल्या मौल्यवान वस्तू, मुर्ती, कलाकृती मिळतात. 


प्रतिकृती माझ्या नजरेसमोर दिसेल अशी ठेवणार


आमदार बाबर यांना भेट दिलेली ही ब्राँझ धातूची बैलगाडी चित्तोडगडमध्ये बनवण्यात आली. शिल्पकलेत ब्राँझ धातूला अनन्यसाधारण महत्व आहे. मी असेपर्यंत ही बैलगाडीची प्रतिकृती माझ्या नजरेसमोर दिसेल अशी ठेवणार असल्याचे सांगत ही भेट नाही तर माझ्यासाठी हा "ठेवा"असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. 


अनिल बाबरांकडून विट्यात मोफत महाआरोग्य शिबिर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटामध्ये हजारो गरजू रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.  ते म्हणाले की, विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सतत टीका करत असतात. मात्र, मुख्यमंत्री राज्यातील गरजू रुग्णांसाठी  बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत करत असतात. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री हे गरजू रुग्णाचे एकनाथ आहेत, अशा भावना हे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करणारे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. सुमारे दीडशेहून अधिक आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका व 500 स्वयंसेवक या महाआरोग्य शिबिरासाठी कार्यरत  होते.


इतर महत्वाच्या बातम्या