Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जत तालुक्यात अमृतवाडीत घरातून शेतमजुराची चार वर्षाची मुलगी आणि तीन वर्षांचा  मुलगा कालपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. सुलोचना आनंद गवळी आणि इंद्रजीत आनंद गवळी अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. जत पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. याबाबत वडील आनंदा गवळी यांनी जत पोलिस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. 


प्राथमिक स्तरावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करुन घेतला आहे. हे कुटुंब ज्या ठिकाणी राहते त्या घराजवळ 60 फूट व्यासाची विहीर आहे. खेळताखेळता ही मुले विहिरीत पडली असल्याची शक्यता गृहित धरून विहिरीत शोध मोहीम घेण्यात येत आहे. विहीरीत पाणी उपसा करण्यात येत असून अजून काहीच हाती लागले नाही. सकाळपासून पुन्हा विहिरीतील शिल्लक पाणी उपसा करुन हाती काही लागते का? याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.


पत्नी रुग्णालयात, घरी आल्यानंतर मुलं दिसेनात


जत येथील द्राक्ष बागायतदार दीपक हत्ती यांच्या शेतात आनंद गवळी हे तीन वर्षांपासून मजूर म्हणून काम करत आहेत. ते या ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह राहतात. आनंद यांची पत्नी आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे सुलोचना व इंद्रजीत ही त्यांची दोन मुले घरीच होती. आनंद गवळी हे घरी गेले त्यावेळी मुले घरात दिसली नाहीत. त्यांनी परिसरात त्यांचा शोध घेतला; पण ती सापडली नाहीत. यामुळे गवळी यांनी जत पोलिस ठाण्यात याबाबत गुरुवारी रात्रीच फिर्याद दिली होती. 


शुक्रवारी पोलिसांनी माहिती घेत परिसरात शोध सुरू केला. घराजवळ असणाऱ्या विहीर व शेततळ्यातील पाण्याचाही उपसा करायला सुरुवात केली आहे, पण हाती अद्याप काहीच लागले नाही. शुक्रवारी (10 फेब्रुवारी) संपूर्ण दिवसभर पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे व पोलिस पथक अमृतवाडी गावात तळ ठोकून होते.


वीज भारनियमनामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यात अडथळा


मुले घरातून बेपत्ता झालेत हे समजल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने घराजवळ असलेल्या 60 फूट व्यासाच्या विहिरीत शोध मोहीम सुरू केली. विहिरीतील पाणी उपसा वीज पंपाच्या मदतीने करण्यात येत होता. मात्र, वीज भारनियमनाने वीजपुरवठा खंडित झाल्याने पंप बंद पडला. यानंतर जनरेटर आणून विहीरीतील पाणी उपसा करण्यात येत आहे. आज सकाळपासून विहिरीतील शिल्लक पाणी उपसा केला जात असून विहिरीमधील शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतरच या दोन मुलांच्या बाबतीत नेमकं काय घडले पोलिस सांगू शकणार आहेत. जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे हे  टीमसह घटनास्थळी असून अन्य शक्यता लक्षात घेउनही मुलांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या