सांगली : सांगली (Sangli News) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. पण या मुलाचा मृत्यू हा कर्नाटकातील एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनला एका नातेवाईक महिलेने तिच्या आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.
मांत्रिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी
या घटनेचे गांभीर्य ओळखून कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावांतील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास कुटुंबाची मानसिक तयारी केली. मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या कडे केली. त्यांनी तात्काळ मुलांच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेतली आहे.
सदर गुन्हा कुडची पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असलेने हा गुन्हा कुडची पोलीस स्टेशनला वर्ग करणार असल्याचे कवठेमहांकाळ पोलिस निरीक्षकानी सांगितले. पण आजच्या विज्ञान युगात किरकोळ आजारासाठी मांत्रिकाकडे जाणे हे अज्ञानपणाचे लक्षण आहे. मांत्रिकाच्या अघोरी कृत्यामुळे अशा घटना घडतात तेव्हा मांत्रिकाच्या पासून सावध रहावे असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी केले आहे.
उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन ठोकली धूम, बीड जिल्ह्यातील घटना
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन धूम ठाकली आहे. एका व्यक्तीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबाने त्याच कुटुंबातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आपले सूत जुळवून तिला घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर याप्रकरणी भोंदूबाबाविरुद्ध युसूफवाडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली (रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे या बाबाचे नाव आहे.
हे ही वाचा :