Sangli News: सूर्यग्रहणावरून अनेक भ्रामक कल्पना एकविसाव्या शतकात अजूनही घर करून बसल्या असतानाच याला छेद देणारी आणि त्या भ्रामक कल्पना किती पोकळ आहेत याची साक्षच देणारी सुखद घटना सांगली जिल्ह्यात घडली. गर्भवती महिलेनं ग्रहण पाहायचं नाही असा दंडकच असताना इस्लामपुरातील नवेखेडमधील पूजा ऋषीराज जाधवने सुर्यग्रहण पाहिले. तसेच इतरही जी कामे ग्रहणात केली जात नाहीत ती सुद्धा केली होती. आता त्याच पूजाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. पूजाने गरोदरपणात चौथ्या महिन्यात ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला होता. 


देशात आजही सूर्यग्रहण पाहणं हे अशुभ मानलं जातं. गरोदर महिलांना सूर्यग्रहण पाहणं दूरच, पण इतरही कामे त्यादिवशी गर्भवती महिलेला करू दिली जात नाहीत. मात्र, या प्रथा, अंधश्रद्धाना मूठमाती देण्याचे काम पूजाने केले आहे. पूजाने अंधश्रद्धांना बाजूला करत सूर्यग्रहणाशी डोळे भिडवले होते. आता पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. चार महिन्यांपूर्वी पूजाला कन्यारत्न झाले. मोठ्या दिमाखात तिचा नामकरण सोहळा पार पडला. लाडक्या लेकीचे नाव 'राजनंदनी' असं नाव ठेवलं आहे. सूर्यग्रहणाबाबत असणाऱ्या अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी पूजाचे पती आणि कुटुंबाने साथ दिली. 


गेल्यावर्षी 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण होते. त्यावेळी पूजा चार महिन्यांची गरोदर होती. तरीही पूजाने सूर्यग्रहण पाहण्याचा निश्चय केला होता. फक्त निश्चय न करता सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लूटला होता. घराच्या टेरेसवर पूजाने आपल्या पतीसह तसेच कुटुंबासमवेत सूर्यग्रहण पाहिले होते. सूर्यग्रहणावेळी कोणत्याही भाजी चिरणे, फळ कापणे सुद्धा कापले जात नसताना पूजाने भाज्या चिरल्या होत्या. तसेच फळेही कापली होती. त्यामुळे ग्रहणातील अंधश्रद्धांचे ग्रहण दूर करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या